शनिवारी कर्नाटकमध्ये भाजप सरकार पडल्यावर काही तासांमध्येच एक नाव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेण्ड होत होतं. ही महिला म्हणजे, पुढील काही दिवसांमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झालेले जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांची दुसरी पत्नी राधिका कुमारस्वामी यांच्याबद्दल. कर्नाटकमध्ये ३८ जागांवर विजय मिळवून मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहणारे कुमारस्वामी यांचे खासगी आयुष्यही फार रंजक आहे.

कुमारस्वामी यांचा जन्म १६ डिसेंबर १९५९ मध्ये झाला. सर्व काही सुरळीत सुरू असताना २००६ मध्ये त्यांच्या आयुष्यात वेगळे वळण आले. कन्नड अभिनेत्री राधिकाशी त्यांनी २००६ मध्ये लग्न केले. राधिका आणि कुमारस्वामी यांच्या वयात २७ वर्षांचा फरक आहे. दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. कुमारस्वामी आणि राधिकाला एक मुलगीही आहे. या दोघांशी निगडीत अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहेत.

कुमारस्वामी यांनी १९८६ मध्ये पहिली पत्नी अनिता यांच्याशी विवाह केला होता. योगायोगाने याच वर्षी राधिकाचा जन्म झाला. राधिकाचा जन्म १ नोव्हेंबर १९८६ मध्ये झाला. राधिकाने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी अर्थात २००२ मध्ये रतन कुमारशी लग्न केले होते. पण हृदयविकाराच्या झटक्याने रतन कुमार यांचे निधन झाले. कुमारस्वामी हे पहिल्या पत्नीशी विभक्त झालेले नाहीत. त्या अजूनही कुमारस्वामी यांच्यासोबत प्रचारादरम्यान दिसतात. मतदानाच्यावेळीही अनिता आणि कुमारस्वामी यांना एकत्र पाहण्यात आले होते.

राधिकाने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत ३२ सिनेमांमध्ये काम केले आहे. तिने फक्त कन्नड सिनेमांमध्येच नाही तर तमिळ सिनेमांतही काम केले आहे. सध्या ती एक निर्माती म्हणून आपलं नाव प्रस्थापित करु पाहत आहे. राधिकाने २००२ मध्ये ‘नीला मेघा शमा’ या कन्नड सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या सिनेमाच्यावेळी राधिका फक्त नववी इयत्तेत होती. पण तिचा प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा नीनागागी हा होता. या सिनेमात तिच्यासोबत विजय राघवेन्द्र यांची प्रमुख भूमिका होती.