अनिल कपूर यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार

राज्य शासनातर्फे राज कपूर यांच्या स्मृतिनिमित्त दिल्या जाणाऱ्या राज कपूर जीवनगौरव पुरस्कारासाठी अभिनेते जितेंद्र यांची निवड करण्यात आली आहे तर अभिनेते अनिल कपूर यांची राज कपूर विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती आणि दिग्दर्शन आदी क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल राजकपूर यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात.

राज कपूर जीवनगौर पुरस्कार पाच लाख रुपये आणि विशेष योगदान पुरस्कार तीन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने जितेंद्र व अनिल कपूर यांची निवड केली. येत्या ३० एप्रिल रोजी बोरिवली येथे जनरल अरुणकुमार वैद्य मैदानावर एका सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. ‘गीत गाता चल’या चित्रपटाद्वारे नायक म्हणून जितेंद्र यांनी हिंदी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यांनी २०० हून चित्रपटातून काम केले असून यातील १०० पेक्षा जास्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘हिट’ ठरले आहेत. अनिल कपूर यांनी ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटातील एका छोटय़ा भूमिकेद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.