अभिनेता ब्रॅड पिट आणि अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हॉलिवूड सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखतात. स्टाईलीश लूक आणि जबरदस्त अभिनयासाठी ओळखले जाणारे ब्रॅड आणि जेनिफर कधीकाळी हॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जायचे. मात्र २००५ साली काही अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी घटस्फोट घेतला. परंतु घटस्फोटानंतरही या जोडीच्या लोकप्रियतेत तसुभरही कमतरता आलेली नाही. गंमतीशीर बाब म्हणजे या जोडीची क्रेज केवळ चाहत्यांमध्येच नाही तर चित्रपट समिक्षकांमध्येही दिसून येते. आणि म्हणूनच की काय दोघांच्या बाबतीत एक अजब योगायोग सातत्याने घडून येताना दिसत आहे.

नुकतेच जेनिफरला ‘स्क्रिन अॅक्टर गाईड २०२०’ हा पुरस्कार मिळाला. ‘द मॉर्निंग शो’ या वेबसीरिजसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्याच वेळी ब्रॅट पिटला ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड’ या चित्रपटातील जबरदस्त अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

‘स्क्रिन अॅक्टर गाईड’ हा हॉलिवूडमधील सर्वाधिक मानाच्या मनोरंजन पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अजब योगायोग म्हणजे ब्रॅड आणि जेनिफर यांना हा पुरस्कार नेहमी एकाच वेळी मिळतो. असा प्रकार यंदाच्या वर्षात तिसऱ्यांदा घडला आहे.

यापूर्वी १९९६ साली जेनिफरला ‘फ्रेड्स’ या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्याच वेळी ब्रॅ़डला ‘स्लीपर्स’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर अशीच घटना २००३ साली घडली. ‘सिंबाद: द लेजंड ऑफ सेव्हन सीझ’ या कार्टूनपटातील एका व्यक्तिरेखेस ब्रॅडने आपला आवाज दिला होता. त्यासाठी त्याला पुरस्कार मिळाला होता. त्याच वेळी जेनिफरला ‘फ्रेड्स’ या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. आणि असा योगायोग घडण्याची ही तिसरी वेळ आहे.