‘तू आशिकी’ आणि ‘इश्क में मरजावाँ’ या प्रेमकथांना विलक्षण यश मिळाल्यानंतर कलर्स आता ‘बेपनाह’ या शोमधून प्रेमाची अजून एक नवी छटा सादर करत आहे. ही प्रेमकथा इतर कथांसारखी नसून, या रोमँटिक ड्रामामध्ये दोन अनोळखी व्यक्तींची एका रहस्यमय अपघातात एकत्र आल्यानंतर घडणारी अशक्य कथा सांगतली आहे. रोमान्स, ड्रामा आणि रहस्य यांचे अगदी योग्य मिश्रण असणाऱ्या या लक्षवेधक कथेमध्ये भारतीय टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहेरे जेनिफर विंगेट झोयाच्या भूमिकेत, हर्षद चोपडा आदित्यच्या भूमिकेत, सेहबान अझिम यश म्हणून(झोयाचा पती) आणि नमिता दुबे पूजाच्या भूमिकेत (आदित्यची पत्नी) दिसणार आहेत. सिनेव्हिस्टाज निर्मित केलेला ही मालिका येत्या १९ मार्च पासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.०० वाजता कलर्स वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.

यावेळी कलर्सच्या प्रोग्रॅमिंग प्रमुख मनीषा शर्मा म्हणाल्या, “ बेपनाहची कथा प्रेम आणि विश्वासघाताची आहे, जी दोन व्यक्तींचं आयुष्य कायमसाठी बदलून टाकते. त्या रात्री काय घडले असावे हे जाणून घेण्याच्या गरजेमुळे आमची मुख्य पात्रं आणि कथा जास्त आकर्षक वाटू लागतात. आमच्या प्रमुख पात्रांमधील केमिस्ट्री आणि त्यांच्या सभोवताली घडणाऱ्या गोष्टींमुळे प्रेक्षक या मालिकेशी जास्त जोडले जातील अशी आम्हाला आशा आहे.”

झोयाची भूमिका साकारणारी जेनिफर विंगेट या मालिकेबद्दल बोलताना म्हणाली की, “मी जेव्हा पहिल्यांदा या मालिकेची कथा ऐकली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले होते. बेपनाहसारखा शो क्वचितच करायला मिळतो. या मालिकेचा एक भाग होऊ शकले याचा मला आनंद आहे. झोया ही अतिशय गोड, नम्र तरुण मुलगी असून ती नेहमी सुरक्षित जीवन जगलेली आहे. तिच्या आयुष्यात ती तिच्या जीवनातील पुरुषांवर नेहमीच अवलंबून राहिलेली आहे. मात्र एका घटनेनंतर तिच्या आयुष्यात कशी उलथा- पालथ होते हे या मालिकेत दिसेल. मला खात्री आहे की प्रेक्षकांना आम्हा कलाकारांची केमिस्ट्री पसंत पडेल.”

आदित्यची भूमिका साकारणारा हर्षद चोपडा म्हणाला की, “मी दीर्घ काळानंतर टेलिव्हिजन वर परत येत आहे. मी योग्य कथेचीच वाट पहात होतो. बेपनाह मालिका स्वीकारण्याचे मुख्य कारण मालिकेची कथा, दिग्दर्शक अनिरुद्ध आणि डिओपी दीपक हे आहेत. जेनिफर आणि माझी भेटल्यावर लगेच मैत्री झाली. आम्हाला दोघांना एकत्र पडद्यावर पाहणे प्रेक्षकांना रोमांचित करेल याची मला खात्री आहे.”