दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या सावलीप्रमाणे वावरणा-या जान्हवीच्या ‘धडक’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कलाविश्वात जान्हवी आणि इशान यांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ‘धडक’च्या निमित्ताने जान्हवीने आता ख-या अर्थाने कलाविश्वात पदार्पण केले आहे. या चित्रपटाची चर्चा होत असतानाच जान्हवीच्या बालपणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे चित्रपटाबरोबरच या व्हिडिओचीदेखील जोरदार चर्चेा होत आहे.

‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या जान्हवीने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मात्र चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कलाविश्वात आणि सोशल मिडीयावर सतत जान्हवीचीच चर्चा सुरु आहे. अनेक स्तरामधून तिच्यावर कौतूकाचा पाऊस पडत आहे. मात्र यावेळी जान्हवीचे कौतूक करायला आज श्रीदेवी हव्या होत्या असं प्रत्येकाच्याच तोंडी येत आहे. दरवेळी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देणा-या जान्हवीने यावेळी तिच्या बालपणाला आणि वडीलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात जान्हवी एका पुरस्कार सोह्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ जान्हवीने स्वत: शेअर केला असून हा व्हिडिओ एका पुरस्कार सोहळ्याचा आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी वडील  बोनी कपूर यांच्याबरोबर एका पुरस्कार सोहळ्यामध्ये विजेत्यांना पुरस्कार प्रदान करताना दिसत आहे. यावेळी बोनी कपूर आणि अभिनेत्री प्रिती झिंटा यांनी सर्वात्कृष्ट अभिनेता म्हणून शाहरुख खान याच्या नावाची घोषणा केली. नावाची घोषणा होताच पुरस्कार घेण्यासाठी मंचावर पोहोचलेल्या शाहरुखला लहानग्या जान्हवीने पुरस्कार प्रदान केला. यावेळी जान्हवी ८-१० वर्षाची असून तिला वडील बोनी कपूर यांच्या कडेवर उचलल्याचं दिसून येत आहे. मंच्यावर आलेल्या शाहरुखनेही प्रथम जान्हवीशी गप्पा मारुन हसत हसत हा पुरस्कार स्वीकारला.

दरम्यान, हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून ‘धडक’चा ट्रेलरही व्हायरल होत आहे. ‘धडक’ हा मराठी चित्रपट ‘सैराट’ याचा हिंदी रिमेक आहे. ‘सैराट’ या चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. त्यामुळे ‘धडक’ देखील प्रेक्षकांच्या मनावर अशीच भुरळ पाडेल असं दिसून येत आहे.