पुन्हा एकदा दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिवंगत अभिनेत्री जिया खानची बहिण करिश्माने साजिद खानने जियाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.
अभिनेत्री जिया खानच्या जीवनावर आधारित ‘डेथ इन बॉलिवूड’ ही डॉक्युमेंट्री बीबीसीवर प्रदर्शित झाली आहे. या डॉक्युमेंट्रीच्या दुसऱ्या भागामध्ये जिया खानची बहिण करिश्माने साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. करिश्माने सांगितले की रिहर्सल सुरु असताना जिया स्क्रीप्ट वाचत होती आणि तेवढ्यात साजिद खान तेथे आला. त्याने जियाला टॉप आणि ब्रा काढण्यास सांगितले होते. त्यावेळी जिया घाबरली आणि घरी आली. ती घरी आल्यावर रडू लागली.
Reminder that Sajid Khan is not in jail yet. pic.twitter.com/cZ5I8Rrys0
— Sidd (@siddanthdaily) January 18, 2021
पुढे ती म्हणाली, जियाने त्यांच्यासोबत करार केला असल्यामुळे तिला त्या चित्रपटात काम करावे लागले. मी या चित्रपटात काम केले नाही तर माझ्या विरोधात कारवाई करतील, माझे करिअर संपेल असे जिया म्हणत होती. त्यामुळे तिने हा चित्रपट केला.
त्यानंतर करिश्माने साजिदने तिच्यासोबतही गैरवर्तन केल्याचे सांगितले आहे. एकदा करिश्मा जियासोबत साजिद खानच्या घरी गेली होती. तेव्हा ती केवळ १६ वर्षांची होती. ती किचनमध्ये एका टेबलवर बसली होती आणि साजिद खान तिच्याकडे एकटक पाहात होता. त्यानंतर तो माझ्याविषयी जियाला काही तरी म्हणाला. तेव्हा जियाने त्याला टोकले. माझी बहिण अजून खूप लहान आहे असं ती त्याला म्हणाली. त्यानंतर आम्ही दोघीही तेथून निघून आलो.
जिया आणि साजिद खानने २०१०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाउसफुल’ चित्रपटासाठी एकत्र काम केले. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, दीपिका पदूकोण, जॅकलिन फर्नांडिस, अर्जुन रामपाल, जिया खान आणि लारा दत्ता हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते.
यापूर्वी मॉडेल पौलाने दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित पौलाने साजिदवर धक्कादायक आरोप केले होते. “साजिद मला अश्लील मेसेज पाठवायचा. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. त्याने मला त्याच्यासमोर विवस्त्र व्हायला सांगितलं. हाऊसफुल चित्रपटात भूमिका देण्याच्या बदल्यात साजिदने मला विवस्त्र व्हायला सांगितलं. त्याने असं किती महिलांसोबत केलंय, हे देवच जाणो. मी कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व उघड करत नाहीये. तेव्हा मी बोलू शकले नव्हते पण आता पुरे झालं. त्याला कारागृहात डांबलं पाहिजे”, अशी पोस्ट पौलाने लिहिली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 19, 2021 12:14 pm