डॉक्टर म्हणजे देवमाणूस.. त्यांना क्षणोक्षणी सलाम करावा असं त्यांचं कार्य. ‘डॉक्टर जणू देवाचं दुसरं रूपच’, असं अनेकांनी कित्येक वेळा म्हटलंय, पण यंदाच्या वर्षी ते अक्षरश: अनुभवलं आहे. २०२० मध्ये डॉक्टरांनी जी कमालीची सेवा केली, त्यांचं कौतुक शब्दांत मांडावं तितकं कमीच. असेच काही जिगरबाज डॉक्टर्स सोनी मराठी वाहिनीच्या ‘जिगरबाज’ मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

सध्या ओटीटी क्षेत्रात वेब सीरिजसाठी ज्या प्रकारे सेटच्या जागी लाइव्ह लोकेशन वापरले जातात. त्याच प्रकारे या मालिकेसाठी हॉस्पिटलचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. फिल्मसिटीमध्ये लोक-आधार हॉस्पिटलचा सेट उभारण्यात आला आहे. हा सेट उभारण्यामागे कला दिग्दर्शक नितीन कुलकर्णी आणि प्रतीक रेडीज यांची मेहनत आहे.

आणखी वाचा : प्राजक्ता गायकवाड ते शिवानी सुर्वे.. ‘या’ मराठी कलाकारांनी मध्येच सोडली लोकप्रिय मालिका

एका हॉस्पिटलची संघर्षगाथा मांडणारी ‘जिगरबाज’ ही मालिका ११ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. सत्तेच्या तुफानाला सत्याचं आव्हान देणाऱ्या जिगरबाज डॉक्टरांची ही गोष्ट आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेत अरुण नलावडे, पल्लवी पाटील, अमृता पवार, श्रेयस राजे, विजय पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. जगदंब क्रिएशन्सनं यापूर्वी ऐतिहासिक मालिकांची निर्मिती केली आहे, पण या नव्या मालिकेच्या निमित्तानी त्यांनी एक वेगळी गोष्ट, वेगळा जॉनर निवडला आहे. विशेष म्हणजे डॉ. अमोल कोल्हे हे स्वत: डॉक्टर आहेत.

‘जिगरबाज’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.