‘निरजा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेला अभिनेता जिम सरभ आता रुपेरी पडद्यावर खलनायक रंगवून कंटाळला आहे. त्यामुळे जिम आता सोज्वळ भूमिकांच्या शोधात आहे. ‘निरजा’ चित्रपटात जिमनं साकारलेल्या अपहरणकर्त्यांची भूमिका सगळ्यांनाच आवडली या भूमिकेमुळे नवा खलनायक बॉलिवूडला मिळाला असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर ‘पद्मावत’मध्ये जिमनं साकारलेली मलिक काफूरची भूमिका तर त्याच्या आतापर्यंतच्या बॉलिवूड करिअरमधली मैलाचा दगड ठरली. ‘संजू’मध्येही त्यानं खलनायकाची भूमिका साकारली होती. मात्र आता त्याला या चौकटीतून बाहेर पडायचं आहे.

‘मला नकारात्मक भूमिका साकारून कंटाळा आला आहे. आता मलाही अशाच प्रकारच्या भूमिकांची ऑफर येत आहे. पण मला या चौकटीतून बाहेर येऊन काहीतरी वेगळं करायचं आहे अशी इच्छा त्यानं बोलून दाखवली आहे. आता आपल्याला सोज्वळ भूमिका करायला आवडतील असंही तो म्हणाला. सोज्वळ भूमिका साकारण्याची कितीही इच्छा जीमला असली तरी अनेकांना रुपेरी पडद्यावर तो खलनायकाच्या भूमिकेत आवडला. त्यामुळे जीमच्या इच्छेप्रमाणे आता सोज्वळ भूमिका साकारायाला मिळणार का हे पाहण्यासारखं ठरेल.