नायकपदासाठी अत्यावश्यक चेहरेकुळापासून बलदंड देमारशाही थाट नसतानाही केवळ अभिनयाच्या ताकदीवर गेली अडीच-तीन दशके सामान्यांतील असामान्य व्यक्तिरेखांमध्ये प्राण फुंकत मनोरंजनाच्या छोटय़ा तसेच मोठय़ा पडद्यावर तळपत राहणाऱ्या इरफान खान यांचे २९ एप्रिल रोजी निधन झाले. गेली दोन वर्ष दुर्धर आजाराशी सामना करीत असलेल्या इरफान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. इरफान यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड हदरल्याचे पहायला मिळाले. अनेकांनी ट्विटवरुन इरफान यांना श्रद्धांजली अर्पण केली. या घटनेही एका आठवड्याहून अधिक काळ लोटला असला आहे. नुकतीच अभिनेता जिमी शेरगीलनेही इरफान यांच्या निधनासंदर्भात एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

या धक्क्यामधून सावरायला आम्हाला वेळ लागेल असं जिमीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इन्स्ताग्रामवर जिमीने इरफान यांचा फोटो पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. मागील अनेक वर्षांमध्ये मी इरफानला एकदाही भेटलो नाही याचं सर्वात मोठं दु:ख माझ्यासोबत कायम राहणार आहे, असंही जिमीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

जिमीची पोस्ट जशीच्या तशी

“आम्हाला वेळ लागणार… खूप वेळ लागणार यामधून वर यायला. या धक्क्यातून सावरण्यासाठी आम्हाला वेळ लागणार. मागील काही वर्षांमध्ये मी तुला एखदाही भेटू शकलो नाही याचे शल्य माझ्यासोबत राहणार आहे, मला वाटतं मी तुला भेटण्याचा प्रयत्नही केला होता पण ते शक्य झाल नाही. आपण एकत्र पाच चित्रपटांमध्ये काम केलं. मला तुझ्याबद्दल खूप प्रेम आणि आदर होता आणि हे तुला माहिती आहे. तुझ्या पहिल्या चित्रपटापासून म्हणजेच हसीलपासूनच मी तुझा चाहता आहे. तू गेला आहेस यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. या सर्वांमधून सावरण्यासाठी देव तुझ्या कुटुंबाला ताकद देवो. तू माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा दिली आहेस आणि देत राहशील. आरआयपी इरफान भाई…”

जिमी आणि इरफान यांनी ‘हासील’, ‘चरस’, ‘यु होता तो क्या होता’, ‘साहेब बिवी और गँगस्टर’ आणि ‘मदारी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.