बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर कायमच त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. अलिकडेच त्यांनी स्वत:ला नास्तिक म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं होतं. एका नेटकऱ्याने तर मोहम्मद अली जिना यांच्या नावाचा उल्लेख करत जावेद यांना ट्रोल केलं. मात्र जावेद यांनी जिनादेखील डुकराचं मांस खायचे आणि व्हिस्की प्यायचे, असं म्हणत या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे.

जावेद अख्तर यांनी स्वत: ला नास्तिक म्हटल्यानंतर त्यांच्यावर नेटकऱ्यांनी टीकास्त्र डागलं. यामध्येच नास्तिक होण्याची हीच योग्य वेळ आहे. जिना बरोबर म्हणायचे, तुम्ही लोक आयुष्यभर तुमची निष्ठा सिद्ध करत बसाल, असं म्हणत मोहम्मद याकूब या नेटकऱ्याने जावेद यांना ट्रोल केलं होतं. त्यावर जावेद यांनी सडेतोड उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.

“कायदे आजमला माझ्या नास्तिक होण्यावरुन कोणतीही समस्या नाहीये. ते तुमच्या सारखे नव्हते. ते जन्मापासूनच शिया मुसलमान होते आणि पाश्चात्यशैलीवर विश्वास ठेवणारे सज्जन होते. ते डुकराचं मांसही खात होते आणि व्हिस्कीदेखील पित होते”, असं उत्तर जावेद यांनी दिलं.

पुढे ते म्हणाले, “बरं एक सांग शिया मुसलमानांना आजही पाकिस्तानमध्ये मुसलमान मानलं जातंय का?. “जावेद यांच्या या उत्तरानंतर ट्विटवर अनेकांनी त्यांची मत नोंदविली आहेत. हे ट्विट तुम्ही केलंय यावर विश्वास बसत नाही. शिया मुसलमानच आहेत. तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न एका नेटकऱ्याने जावेद यांना विचारला आहे. त्यामुळे काही जण जावेद यांना पाठिंबा देत आहेत. तर काही जण जावेद यांच्यावर पुन्हा टीका करत आहे.

दरम्यान, बंगळुरुमध्ये काही दिवसापूर्वी जीजस यांची प्रतिमा हटविण्यात आली होती. त्यावर जावेद यांनी पोलिसांवर टीका केली होती. त्यानंतर अनेक ट्विट करत त्यांचं मत नोंदविलं होतं. यामध्येच त्यांनी मी नास्तिक असल्याचं म्हटलं होतं. तेव्हापासून ट्विटवर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.