बॉलिवूड अभिनेत्री तब्बूसोबत जोधपूर विमानतळावर छेडछाडीचा प्रकार घडला. बुधवारी तब्बू मुंबईहून जोधपूरला जायला निघाली. जोधपूरला उतरल्यावर विमानतळाच्या बाहेर तिच्यासोबत हा प्रसंग घडला. तब्बू विमानतळाच्या बाहेर पडल्यावर तिच्या सुरक्षा रक्षकांनी तिला घेराव घातला होता. पण सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून एक अज्ञात व्यक्ती तिच्या जवळ आला आणि अंगलगट करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी वेळीच त्याला तब्बूपासून दूर केले. तब्बू या सर्व प्रकरणाने चांगली घाबरली होती. या प्रकरणी अजूनपर्यंत कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.

तब्बू जोधपूरमध्ये १९ वर्षांपूर्वीच्या काळवीट हत्या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीसाठी गेली होती. १९९८ मध्ये हम साथ साथ है सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान सलमानवर काळवीटची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. सलमानसोबत त्यावेळी नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि सैफ अली खान जीपमध्ये उपस्थित होते.

सलमानसोबत उपस्थित असल्यामुळे या सर्व कलाकांवरही आरोप लावण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वी काळवीट हत्याप्रकरणी आणि अवैध शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र राजस्थान राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान केले होते.