बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास २ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. ग्लोबल स्टार म्हणून ओळख असलेले प्रियांका आणि निक जोधपूरमधल्या उमेद भवन या आलिशान महलात लग्नगाठ बांधणार आहे. या बॉलिवूडमधल्या सर्वात मोठ्या विवाहसोहळ्यासाठी जोधपूर सज्ज झालं आहे. मात्र लग्न सोहळ्यातील इतर कार्यक्रम सुरू व्हायला अवघा एक दिवस उरला असताना एक विघ्न आलं असून, या विघ्नामुळे प्रियांकाला नियोजनात ऐनवेळी काही बदल करावे लागले असल्याचं समजत आहे.
प्रियांका निकचा विवाहसोहळा हा उमेद भवनमध्ये होणार आहे. मात्र लग्नाच्या आधीच्या विधी आणि कार्यक्रमासाठी मेहरानढाची निवड करण्यात आली. संगीत, मेहंदी, पूजा हे कार्यक्रम मेहरानढावर होणार होते. मात्र जोधपुर पोलिसांनी प्रियांका- निक आणि पाहुण्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यास नकार दिल्यानं प्रियांकानं लग्नसोहळ्यातले कार्यक्रम हे उमेद भवनमध्ये करायचे ठरवले असल्याचं समजत आहे.
पुढील आठवड्यात राजस्थानमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे पोलीस व्यग्र आहेत. अशावेळी प्रियांकाच्या लग्नासाठी सुरक्षा पुरवणं शक्य होणार नाही असं जोधपुर पोलिसांनी जोनास- चोप्रा कुटुंबियांना सांगितलं असल्याचं समजत आहे. प्रियांका सुरक्षेसाठी जोधपुर पोलिसांवर पूर्णपणे अवलंबून नाही, तिने आधीच सुरक्षा पुरवणाऱ्या एका खासगी कंपनीला सुरक्षेची जबाबदारी देऊ केली आहे.
मात्र तरीही स्थानिक पोलिसांनी मेहरानगढ ते उमेद भवन पॅलेस पर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षा पुरवावी असं प्रियांकाला वाटत होतं. पण, पोलिसांनी असमर्थता दर्शवल्यानंतर सुरक्षेच्या कारणावरून तिनं मेहरानगढावरचे कार्यक्रम रद्द करून ते उमेद भवनमध्ये ठेवले असल्याचं म्हटलं जात आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 4:51 pm