बॉलीवूडचा अभिनेता ‘जॉन अब्राहम जेव्हा पोलिसांना मारतो’ असे म्हटल्यामुळे प्रेक्षकांनाही आश्चर्य वाटण्याची आणि त्याने पोलिसांना का ‘मारले’ असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे. पण जॉनने पोलिसांना केलेली ‘मारहाण’ ही प्रत्यक्षातील नसून तो त्याच्या आगामी चित्रपटातील एक प्रसंग आहे.

मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामत ‘दृश्यम’ नंतर दिग्दर्शित करत असलेला ‘रॉकी हॅण्डसम’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटात जॉन अब्राहम आणि श्रुती हसन हे प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटातील एका प्रसंगात जॉन हा पोलिसांना ‘मारहाण’ करताना दाखविला असून तो प्रसंग नुकताच चित्रित करण्यात आला. याबाबतचा एक व्हीडिओही तयार करण्यात आला आहे. स्वत: जॉन अब्राहम याने ‘ट्विटर’वरून हा व्हीडिओ प्रेक्षकांकरता सादर केला आहे. या प्रसंगाचे चित्रीकरण कसे करण्यात आले, हेही त्याने त्यात नमूद केले आहे.

जॉन अब्राहम याची ‘जेए एन्टरटेंटमेट’, सुनील क्षेत्रपाल याची ‘आझुरे एन्टरटेंटमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रॉकी हॅण्डसम’ची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट ‘दी मॅन फ्रॉम नोवेअर’ या कोरियन चित्रपटाचा बॉलीवूड रिमेक असून चित्रपट येत्या २५ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.