संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’चे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात अधिकच उत्सुकता वाढली आहे. दीपिका पदुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील राणी पद्मावती, राजा रावल रतन सिंह आणि अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेतील प्रत्येकी दोन पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. येत्या १ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल. पण, हे पोस्टर्स पाहता त्याच काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी ही एक धोक्याची घंटा असल्याचे दिसते. त्यामुळेच की काय अभिनेता जॉन अब्राहमने त्याच्या आगामी ‘परमाणू’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

वाचा : अतिरेकी हल्ल्यानंतर २१५ कोटींच्या चित्रपटाचा प्रीमियर रद्द

‘परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण’मध्ये जॉनची मुख्य भूमिका असून, त्याने याची निर्मितीही केलीय. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांना एका योग्य तारखेची गरज असल्याचे जॉनने म्हटलेय. मनोरंजनाच्या उद्देशाने अनेक चित्रपट तयार केले जातात. पण, आपल्या देशाला समोर ठेवून फार कमी चित्रपटांची निर्मिती होते. आताच्या मॉडर्न भारतासाठी ‘परमाणू’सारख्या चित्रपटाची गरज असल्याचे मला वाटते. त्यामुळेच योग्य दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, असे जॉन म्हणाला.

‘पद्मावती’ चित्रपट १ तर ‘परमाणू’ ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, ‘पद्मावती’सोबत होणारी टक्कर टाळण्यासाठी ‘परमाणू’च्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. ‘पद्मावती’ चित्रपट आधी १७ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. याविषयी जॉन म्हणाला की, आता मी केवळ अभिनेता नसून चित्रपटाचा निर्मातासुद्धा आहे. क्रिअज एण्टरटेन्मेन्टसोबत मी ‘परमाणू’ची संयुक्त निर्मिती करतोय. त्यामुळे, व्यावसायिक म्हणून आम्हाला बॉक्स ऑफिस कलेक्शनचाही विचार करण्याची गरज आहे.

वाचा : घरगुती हिंसाचार प्रकरणी लिएँडर पेसच्या अडचणीत वाढ

‘परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण’मध्ये डायना पेन्टी, बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत. झी स्टुडिओ, जेए एण्टरटेन्मेन्ट आणि क्रिअज एण्टरटेन्मेन्टची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्माने केले आहे.