बॉलिवुडमध्ये २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन संदेश देत अभिनेता जॉन अब्राहमने चित्रपट निर्मिती क्षेत्रात यशस्वीरित्या पदार्पण केले. दमदार कथानकांच्या चित्रपटांना प्राधान्य देत जॉनने आजवर त्याच्या ‘जेए’ निर्मितीअंतर्गत ‘मद्रास कॅफे’ (२०१३), ‘रॉकी हॅम्डसम’ (२०१६) आणि ‘फोर्स २’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. वेगळ्या कथानकांना प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडणारा जॉन आता लवकरच एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.
अंतर्गत सुत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार जॉन दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असून याविषयी त्याने काही दिग्दर्शकांशी चर्चा केली असल्याचे कळते. स्थानिक भाषांमधल्या चित्रपटांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जॉन उत्सुक असला तरी, प्रादेशीक चित्रपटाच्या निर्मितीबाबतची माहिती करुन घेतल्यानंतर जॉन ही उडी घेणार आहे. मराठी चित्रपट निर्मितीबाबत गेले काही महिने जॉन अब्राहमने काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या भेटी घेतल्या आहेत. काही निष्णांत मंडळींची साथ घेत प्रभावी कथानकाचा शोध घेण्याकडे त्याचा कल असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. चित्रपट कथानकाच्या बाबतीत नेहमीच सारासार विचार करणाऱ्या जॉन अब्राहमच्या निर्मितीत कोणता मराठी सिनेमा साकारणार याकडेच साऱ्यांचे लक्ष सागून राहीले आहे. अभिनेता जॉन अब्राहम सध्या ‘ढिशूम’ चित्रपटाच्या निमित्ताने अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर येत आहे. बऱ्याच काळानंतर पडद्यावर झळकणाऱ्या जॉनच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल रसिकांमध्ये कुतुहलाचे वातावरण आहे.