20 November 2019

News Flash

‘दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही’

दीपिका -रणवीरने इटलीमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती लग्न केलं आहे.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण

गेल्या अनेक दिवसापासून चाहत्यांसोबतच बॉलिवूडमध्ये दीप-वीरच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर या दोघांचा लग्नसोहळा नुकताच पार पडला असून अजून देखील त्यांच्याविषयीच्या चर्चा काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत. अनेकांनी या नव विवाहीत दाम्पत्याला भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या साऱ्यावर अभिनेता जॉन अब्राहम चिडला असून त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईतील एका नामांकित ब्रँण्डच्या प्रमोशन इव्हेंमध्ये जॉनने नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी दीपिका-रणवीर ही जोडी नुकतीच विवाहबंधनात बांधली गेली असून त्यांना तू काय शुभेच्छा देणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न ऐकताच या साऱ्या गोष्टींवर गप्पा मारण्याएवढा वेळ माझ्याकडे नाही, असं जॉन म्हणाला. जॉनचं हे उत्तर ऐकून उपस्थित साऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे.

‘एखाद्याच्या लग्नावर वायफळ चर्चा करणं म्हणजे स्वत:चा वेळ वाया घालवण्यासारखं आहे. या सगळ्या गोष्टींवर गप्पा मारणं माझ्यासाठी वेळ वाया घालवण्यासारखं आहे. मी या ब्रँण्डच्या प्रमोशनसाठी आलो आहे. त्यामुळे मला काही विचारायचं असेस तर या ब्रँण्डसंबंधी विचारा, असं जॉन म्हणाला.

दरम्यान, दीपिका -रणवीरने इटलीमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती लग्न केलं असून लवकरच ही जोडी मुंबईमध्ये परतणार आहे. तर जॉन सध्या त्याच्या आगामी ‘बाटला हाऊस’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असून हा चित्रपट पुढील वर्षी १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on November 16, 2018 12:18 pm

Web Title: john abrahams shocking reaction on ranveer deepika wedding
Just Now!
X