‘शूट आऊट अॅट वडाला’ , ‘शूट आऊट अॅट लोखंडवाला’ यासारखे चित्रपट बनवण्यात हातखंडा असलेला निर्माते, दिग्दर्शक संजय गुप्ता लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन येणार आहेत. गँगस्टर असणारे चित्रपट बनवण्यासाठी संजय गुप्ता प्रसिद्ध आहे. हा नवीन चित्रपटही ‘गँगस्टर’ थीमवर आधारित असून यामध्ये बॉलिवूडचे दोन सुप्रसिद्ध कलाकार एकत्र येणार आहेत.

या चित्रपटात जॉन अब्राहम व इम्रान हाश्मी एकत्र काम करणार आहेत. ‘शूट आऊट अॅट वडाला’मध्ये जॉनने काम केले होते. हा चित्रपट १९८० ते १९९०च्या काळावर आधारित असेल. ‘बॉम्बे’ची ‘मुंबई’ होण्याचा, स्थित्यंतराचा हा काळ होता. या काळात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. मिल्स बंद होणं, व्यावसायिकांचे खून, व्यवसाय, पोलीस, राजकारणी यांचे संबंध या सगळ्या घटना या चित्रपटात दिसतील. चित्रपटनिर्मात्यांनी असे सांगितले की, “हा चित्रपट आमच्यासाठी खूप खास आहे. आमच्या मनात या चित्रपटासाठी खास जागा आहे.” ‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार, या चित्रपटात दोघांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. या दोघांमधील भांडणाची दृश्य चित्रपटात दिसतील.

संजय गुप्ता म्हणाले की, “जॉनसोबत हा माझा तिसरा चित्रपट असून मी इम्रानसोबत काम करण्यासही खूप उत्सुक आहे. त्याच्याबरोबर काम करण्याची माझी नेहमीच इच्छा होती. पुन्हा एकदा ‘गँगस्टर’ नाट्य असलेला चित्रपट करताना घरी परत आल्यासारखं वाटतंय. “फक्त दिग्दर्शनच नाही तर, भूषण कुमारसोबत संजय गुप्ता या चित्रपटाची निर्मितीही करणार आहेत. जुलैमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार असून वर्षाच्या अखेरीस शूटिंग पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच जॉन व इम्रान एकत्र येणार आहेत.

सध्या जॉन ‘पागलपंती’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. इम्रान अमिताभ बच्चन यांच्या ‘चेहरे’मध्ये काम करणार असून २१ फेब्रुवारी २०२० साली हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सांगण्यात येत आहे.