गेल्या काही दशकांमध्ये कलाविश्वामध्ये बराच बदल झाल्याचं पाहायला मिळतंय. छोट्या पडद्याचा विस्तारही यामध्ये झाला आहे. केवळ मालिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या छोट्या पडद्यावर आता रिअॅलिटी शोची रेलचेल पाहायला मिळते. या शोच्या माध्यमातून अनेकांच्या अंगी असलेले गुणवैशिष्ट समोर येत आहेत. विशेष म्हणजे या शोमुळेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला आहे. त्यामध्येच आता प्रसिद्ध विनोदवीर जॉनी लिव्हर एका मराठी रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक पदाची धुरा सांभाळणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील एक टप्पा आऊट, कॉमेडीटा पाऊट या कार्यक्रमामध्ये कॅमेडीचा बादशहा जॉनी लिव्हर परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत मराठीतील अन्य दोन दिग्गजही कलाकार असणार आहेत. या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विनोदवीरांचा शोध घेतला जाणार आहे.

‘स्टार प्रवाह’वाहिनीने नव्या विनोदी कलाकारांसाठी ‘एक टप्पा आऊट’च्या निमित्ताने मोठं व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं आहे. ‘एक टप्पा आऊट’मध्ये माझा सहभाग आहे याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून मला अभिमान आहे”, अशा शब्दात अभिनेते जॉनी लिव्हर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, येत्या तीन मार्चपासून ‘एक टप्पा आऊट’ च्या ऑडिशन्सना सुरुवात होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि रत्नागिरी येथे या ऑडिशन्स पार पडणार आहेत.