बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने चित्रपटांमध्ये नौदल अधिकारी ते गँगस्टरपर्यंत अशा हरत-हेच्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणा-या हा अभिनेता स्वतः कोणत्याही भूमिकेकरिता तयारी करण्यापेक्षा दिग्दर्शकाच्या तयारीवर विश्वास ठेवतो असे त्याचे म्हणणे आहे.

आगामी ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाकरिता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अक्षय म्हणाला की, मी स्वतःला कोणत्याच भूमिकेकरिता तयारी करत नाही. माझे दिग्दर्शकच माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त तयारी करतात असे मला वाटते. माझ्या मते, चित्रपटासाठी तयारी करण्यात मी दिग्दर्शकांशी स्पर्धा करू शकत नाही. कारण, ते एका वर्षात एक चित्रपट करतात तर मी एकापेक्षा जास्त चित्रपट करतो. त्यामुळे मी दिग्दर्शकाच्या तयारीप्रमाणेच काम करायला हवे असा माझा विचार आहे. मी दिग्दर्शकासमोर जास्त हुशारी दाखविण्याचा प्रयत्न करत नाही.

दरम्यान, बॉलीवूडचा हा आघाडीचा अभिनेता लवकरच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत लवकरच झळकणार आहे. ‘जॉली एलएलबी’ या सुभाष कपूर दिग्दर्शित चित्रपटाच्या त्याच नावाने येणाऱ्या सिक्वलमध्ये अक्षय कुमार जॉलीच्या म्हणजेच जगदीश्वर मिश्राच्या मुख्य भूमिकेत आहे. याआधीच्या चित्रपटात जॉलीची भूमिका अभिनेता अर्शद वारसीने केली होती. मात्र सिक्वलमध्ये अक्षय कुमारची वर्णी लागली आहे. या चित्रपटाची चर्चा मराठीमध्ये होणे ही हिंदीवाल्यांसाठी आवश्यक बाब ठरू लागली असल्याने आपल्या चित्रपटासाठी अक्षय कुमार पुन्हा मराठीकडे वळला आहे. मात्र यावेळी त्याने ‘चला हवा येऊ द्या’ ऐवजी सध्या नंबर वन असलेल्या ‘तुझ्यात जीव गुंतला’ या मालिकेची निवड केली आहे. आता लखनौमधला जगदीश्वर मिश्रा आणि कोल्हापूरचा राणा यांची भेट होणार कशी? हा या कथेचा गमतीचा भाग ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘जॉली एलएलबी २’ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. एका किचकट खटल्यामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे शोधण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींवर मात करणारा ‘जॉली’ आणि त्याच्या वाटेमध्ये अडथळा बनून येणारे काही लोक यावर हा ट्रेलर भाष्य करतो. ‘आय विल सी यु इन कोर्ट..’ ही ओळ या ट्रेलमध्ये अनेकांचेच लक्ष वेधत आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेते अन्नू कपूर आणि अक्षय कुमारच्या प्रभावी अभिनयाची झलक पाहायला मिळते. त्यामुळे एका वकिलाच्या मार्गात कोणताही खटला लढवताना अगदी वाईट परिस्थितीही उद्भवू शकते याचा अंदाज हा ट्रेलर पाहिल्यावर येत आहे.