बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ या आगामी सिनेमाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायलयाने या सिनेमा विरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या सिनेमात वकिलांची किंवा न्यायाधीशांची बदनामी करण्यात आली आहे असा आरोप या सिनेमावर करण्यात आला होता.

तसेच अजय कुमार वाघमारे नावाच्या एका वकिलाने उच्च न्यायालयात या सिनेमा विरोधात याचिका दाखल करत म्हटले होते की, या सिनेमाच्या नावातून एलएलबी हा शब्द वगळण्यात यावा तसेच न्यायालयात वकील पत्ते खेळताना दाखवण्यात आले असल्याचे दृश्यही वगळण्यात यावे अशी मागणी त्याने केली होती. याचिकेत हेही सांगण्यात आले होते की कायद्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत काही प्रतिबंधनही आहेत. याचिकेनुसार या सिनेमात न्यायालयाशी निगडीत लोकांचे विनोदी चित्रण करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औंरगाबादच्या खंडपीठाने ‘जॉलीएलएलबी २’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वी पाहण्यासाठी दोन अमायकस क्युरीची (न्याय मित्र) नियुक्ती केली होती. त्यामुळे अजूनही

या सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवारच आहे असे म्हणावे लागेल. कारय याचा अंतिम निर्णय ३ फेब्रुवारीला होणार आहे.
मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयात आता जॉली एलएलबी २ च्या निर्मात्यांची सुनावणी होईल. या सुनावणीची तारीख ३ फेब्रुवारी ठरवण्यात आली आहे. पण दुसरीकडे जॉली एलएलबी २ सिनेमाच्या वकिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाची संमती मिळाली आहे आणि पॅनलची नियुक्तीही कायद्यानुसार नसते. सेंसॉर बोर्डाने सिनेमाला यू/ए सर्टिफिकेट दिले आहे.

‘जॉली एलएलबी’ या सुभाष कपूर दिग्दर्शित सिनेमाच्या त्याच नावाने येणाऱ्या सिक्वलमध्ये अक्षय कुमार जॉलीच्या म्हणजेच जगदीश्वर मिश्राच्या मुख्य भूमिकेत आहे. याआधीच्या सिनेमात जॉलीची भूमिका अभिनेता अर्शद वारसीने केली होती. मात्र सिक्वलमध्ये अक्षय कुमारची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘जॉली एलएलबी २’ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. एका किचकट खटल्यामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे शोधण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींवर मात करणारा ‘जॉली’ आणि त्याच्या वाटेमध्ये अडथळा बनून येणारे काही लोक यावर हा ट्रेलर भाष्य करतो.