मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानने ‘दंगल’ चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा बॉलीवूडवर त्याची हुकुमत असल्याचे दाखवून दिले. आमिरच्या ‘पीके’नंतर ‘दंगल’ चित्रपट हा बॉलीवूडसाठी मैलाचा दगड ठरला. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील धाकड यशानंतर आमिरने काही दिवसांपूर्वीच एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहावयास मिळाली. आमिर आणि किरणने या पार्टीचे यजमानपद भूषवत सर्व पाहुण्यांचे स्वतः स्वागत केले.

बॉलीवूडचा हॅण्डसम हंक शाहिद कपूर याने त्याची पत्नी मीरा राजपूत हिच्यासह पार्टीला हजेरी लावली होती. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, या पार्टीत हर्षवर्धन कपूरची शाहिद आणि मीराशी धडक झाली. त्यावेळी शाहिद मस्करीत म्हणाला की, ‘जबाबदार विवाहीत जोडपी पार्टीत येण्याआधीच ही सगळी तरुण मंडळी इथून निघून जात आहेत. आता उलट होऊ लागले आहे.’ त्यावर हर्षवर्धनही कसा गप्प बसेल. लगेच त्याने म्हटले की, ‘मोठ्यांसाठी आम्ही जागा करून देतोय.’ मग काय शाहिदही शांत बसला नाही. ‘जुता मारू उतार के? सिनीयर हू मै?’, असे हसत हसत म्हटले.

काही दिवसांपूर्वीच शाहदिने त्याच्या लाडक्या लेकीचा पहिलावहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. मिशाचा सुरेख फोटो पोस्ट करत शाहिदने ‘हॅलो वर्ल्ड’ असे कॅप्शन फोटोसोबत लिहिले होते. शाहिदच्या या कॅप्शनमधून त्याने मिशाची सर्वांसोबत ओळखच करुन दिली होती. मिशाच्या जन्मानंतर तिचा हा पहिलाच संपूर्ण चेहरा दिसत असलेला फोटो शाहिदने शेअर केल्यामुळे सध्या ‘रंगून’ डॅडीची ही लाडकी लेक प्रकाशझोतात आली आहे असेच म्हणावे लागेल. दरम्यान, सध्या शाहिद त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामामध्ये व्यग्र आहे. शाहिदच्या कामाविषयी बोलायचं झालं तर सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तो वाट पाहत आहे. ‘रंगून’ चित्रपटाविषयी बोलताना शाहिदने दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या कामाची प्रशंसा केली होती. शाहिद म्हणाला होता की, ‘विशाल भारद्वाज सरांसोबतचा हा माझा तिसरा चित्रपट आहे. त्यांच्यासोबत काम करणे हे माझ्यासाठी नेहमी खूप महत्त्वाचे आणि खास असते. लोक हा चित्रपट पाहतील आणि त्यांना तो आवडेल अशी मी अपेक्षा करतो. माझ्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी रंगून प्रदर्शित होतोय. त्यामुळे अपेक्षा करतो की, चित्रपटाच्या यशानेच मी माझा वाढदिवस साजरा करेन’, पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत शाहिदने हे वक्तव्य केले होते. शाहिदच्या या आगामी चित्रपटात अभिनेता सैफ अली खान आणि कंगना रणौतसुद्धा मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. शाहिद कपूर, सैफ अली खान आणि कंगना रणौत अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘रंगून’ येत्या २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

https://www.instagram.com/p/BQPoGo-j4bg/