नव्वदच्या दशकात ‘माचिस’ आणि ‘जोश’ यांसारख्या चित्रपटांत भूमिका साकारलेला अभिनेता चंद्रचूड सिंग नंतर इंडस्ट्रीतून गायबच झाला. २००० मध्ये त्याच्यासोबत घडलेल्या एका अपघातानंतर त्याचं करिअरच संपलं. ‘पिंकविला’ या वेबसाइटला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्या अपघाताच्या कटू आठवणी सांगितल्या.

गोव्यात जेट स्कीइंग करताना हाताचा ताबा सुटल्याने त्याला जबर मार लागला. स्पीड बोट प्रचंड वेगाने पुढे जात होती आणि चंद्रचूडचा उजवा हात खांद्यापासून पुढे खेचला गेला. “मी स्वत:ला नशिबवान समजतो की माझा हात धडापासून वेगळा झाला नाही. कारण मी जेव्हा खाली पडलो तेव्हा उजवा हात फक्त स्नायू आणि त्वचेच्या आधारे लटकत होता. आठ वर्षे घरी बसल्यानंतर नवीन काम मिळणं खूप अवघड होतं. जे मिळायचे त्यात काम करायची इच्छा राहिली नव्हती”, असं त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “फिजिओथेरपीनंतरही अनेकदा शूटिंग करताना मध्येच खांदा दुखू लागायचा. त्यामुळे मी पुन्हा बरा होईपर्यंत शूटिंग रद्द करावे लागत होते. शस्त्रक्रिया आणि फिजिओथेरपी केल्यानंतरही दुखण्याचा त्रास पुन्हा उद्भवू लागला. या अपघातामुळे माझ्या करिअरवर खूप मोठा परिणाम झाला.”

चंद्रचूड आता अनेक वर्षांनंतर ‘आर्या’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राम माधवानी यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं असून यात सुश्मिता सेनचीही भूमिका आहे.