९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे जुही चावला. आमीर खानसोबत ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या जुही चावलाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र जान्हवी आणि अर्जुन या तिच्या मुलांना तिचे चित्रपट पाहायला अजिबात आवडत नसल्याचं जुहीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत जुहीने सांगितलं, “जान्हवी आणि अर्जुन यांना माझे काही चित्रपट दाखवण्याचा मी प्रयत्न केला. पण त्यांना ते आवडले नाहीत. माझ्या मुलाने माझे रोमॅण्टिक चित्रपट पाहण्यास साफ नकार दिला. माझ्या करिअरमधील सुरुवातीचे चित्रपट त्यांना अजिबात आवडत नाहीत. माझ्या पतीने (जय मेहता) त्यांना हम है राही प्यार के हा चित्रपट पाहण्यास सांगितलं. तेव्हा मुलाने विचारलं की, त्यात रोमॅण्टिक दृश्ये आहेत का? तर मी म्हणाले हो, कारण तो रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट आहे. त्यावर तो म्हणाला की, मला तुझे कोणतेच रोमॅण्टिक चित्रपट पाहायचे नाहीत. मला खूप विचित्र वाटतं. त्यामुळे मी तुझे कोणतेच चित्रपट पाहणार नाही असं मुलाने स्पष्ट केलं.”

‘मै कृष्ण हूँ’ आणि ‘चॉक एन डस्टर’ हे दोनच चित्रपट मुलांना आवडल्याचं तिने पुढे सांगितलं. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात जुही शेवटची दिसली होती. या चित्रपटात अनिल कपूर, राजकुमार राव आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत होते.