‘विलो स्मर्फ्स’ ही ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सची आजवरच्या सर्वात आवडत्या भूमिकेपकी एक आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘स्मर्फ्स’ हा तिचा सर्वात आवडता अ‍ॅनिमेशनपट असून या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेले अनेक गमतीदार किस्से तिने सांगितले.ज्युलिया रॉबर्ट्सने ‘स्मर्फ्स : द लॉस्ट व्हिलेज’ या चित्रपटात ‘विलो स्मर्फ्स’ या पात्राला आवाज दिला होता. लहान मुले ते वृद्ध प्रेक्षक या सर्व वयोगटात गाजलेल्या स्मर्फ्स या थ्रीडी अ‍ॅनिमेशनपट मालिकेतील हा सातवा चित्रपट आहे. शांत, कणखर आणि आत्मविश्वास बाळगणारी विलो मुलींना शत्रूबरोबर लढायचे कसे या संदर्भात मार्गदर्शन करत असते. दरम्यान तिच्या आयुष्यात अनेक संकटे येतात, पण ती त्यांच्यावर मात करत आपले कार्य सिद्धीस नेते. ‘स्मर्फ्स’ हे ज्युलिया रॉबर्ट्सचे सर्वात आवडते कार्टून आहे. त्यामुळे या चित्रपटात काम करून तिला आपले स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते. ज्युलियाच्या मते अ‍ॅनिमेशनपटात काम करणे हे तिच्यासाठी आव्हान होते. कारण इतर चित्रपटात काम करताना हावभाव, अभिनय आणि आवाजावर नियंत्रण ठेवावे लागते. पण कार्टूनपटात काम करताना तुमचा आवाज आणि पडद्यावरील कार्टून यांच्यात समन्वय साधावा लागतो. त्यामुळे हे काम खूप अवघड असते. पण अशाच कठीण प्रसंगातून मिळवलेला अनुभव एक परिपूर्ण कलाकार बनण्यास मदत करतो, हा ज्युलियाचा विश्वास असल्याने तिने या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला होता.

‘कॅली एसबरी’दिग्दर्शीत ‘स्मर्फ्स : द लॉस्ट व्हिलेज’हा ऍनिमेशनपट‘स्मर्फ्स’ मालिकेतील सातवा चित्रपट आहे. याआधि ‘द स्मर्फ्स’ (१९६५), ‘द मॅजिक फ्लूट’ (१९७६), ‘द स्मर्फ्स’ (२०११), ‘द स्मर्फ्स:ख्रिसमस कॅरोल’ (२०११), ‘द स्मर्फ्स २’ (२०१३), ‘द स्मर्फ्स: लेजंट ऑफस्मर्फी हॉलो’ (२०१३)हे चित्रपट खुप गाजले होते. स्मर्फ्स ही एका काल्पनीक खेड्यातील निळ्या रंगातल्या कार्टुन्सची ही एक गोष्ट आहे.ही कार्टुन कॅरॅक्टर्स आपल्या दैनंदीन मानवी जिवनात आल्यावर काय काय धमाल होउ शकते यावर चित्रपटाच्या कथेचे रेखाटन केले गेले आहे. स्मर्फ्सफेट आणि तिचे फ्रेण्ड ब्रेनी, क्लुमसी आणि हेफ्टी हे फोर्बिडेनच्या जंगलात एका रहस्यमय खेड्याच्या शोधात पोहोचतात. तिथे त्यांची भेट दुष्ट जादूगार गार्गमेल याच्याशी होते. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात येणारी विविध संकटे आणि या संकटांवर मात करणारे स्मर्फ्स यांची धमाल या चित्रपटात आहे.

कार्टून कथानकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘स्टॅसी हारमन’ आणि ‘पामेला रिबोन’ यांनी या कथेचे लिखाण केले आहे. ज्युलिया रॉबर्ट्स व्यतिरिक्त ‘डेमी लोवाटो’ (स्मर्फ्समेट), ‘रॅन्न विल्सन’ (गार्गमेल), ‘जो मॅँगानिएलो’ (हेफ्टी स्मर्फ्स), ‘जॅक मॅकब्रेअर’ (क्लुमसी स्मर्फ्स), ‘डॅनी पुदी’ (स्मर्फ्सब्लोसोम), ‘एलिअल विंटर’ (स्मर्फ्स लिली), ‘मॅण्डी पटिंकिन’ (पापा स्मर्फ्स) यांनी या चित्रपटातील पात्रांना आवाज दिला होता.