‘हिलिंग इज ब्युटीफूल’ या भावस्पर्शी वाक्यातच सारं काही सामावलं आहे. आपल्या दुःखावर हळुवार कोणी फुंकर मारली तर सगळंच सुरळीत, सुंदर होऊन जातं. आयुष्याकडे पाहण्याची एक नवीन दिशा मिळते. अशाच काहीशा आशयावर आधारित ‘जून’ ही वेबफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबफिल्मच्या प्रदर्शनाबाबत सर्वत्र चर्चा सुरु असतानाच आता प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी ‘जून’ चित्रपटातील ‘हा वारा’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला जितेंद्र जोशी यांनी शब्दबद्ध केले आहे तर शाल्मलीने संगीत दिले आहे. अवघ्या औरंगाबादची सफर घडवणारे हे गाणे मनाला स्फूर्ती देणारे आहे.

हे एक मोंटाज सॉंग असून औरंगाबादमधील अनेक प्रेक्षणीय स्थळे, मार्केट, गजबजलेल्या गर्दीच्या ठिकाणी या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मुळात नेहा आणि सिद्धार्थ हे दोन्ही चेहरे नावाजलेले असल्यामुळे त्यांच्यासोबत अशा ठिकाणी चित्रीकरण करणे हे खरंच खूप आव्हानात्मक होते. तरीही प्रॉडक्शन टीमने आणि दिग्दर्शकांनी औरंगाबादकरांचे जनजीवन विस्कळीत होऊ न देता तसेच कलाकारांनाही कोणताही त्रास होऊ न देता या गाण्याचे चित्रीकरण यशस्वीरित्या पार पाडले.

या गाण्याबद्दल शाल्मली म्हणते, ”खरं सांगायचं तर हे गाणे मी गाताना खूपच एन्जॉय केले आहे. मनाला स्पर्श करणारे हे गीत प्रवासादरम्यान सुखद अनुभव देणारे आहे. श्रोत्यांना हे गाणे नक्कीच आवडेल.” तर या गाण्याबद्दल नेहा आणि सिद्धार्थ सांगतात,” एखादी व्यक्तिरेखा साकारताना अनेकदा आपण त्यात गुंतून जातो. त्यातही एखादा भावनिक विषय असेल तर आपोआपच आजूबाजूचं वातावरणही नकळत भावनिकच झालेलं असतं. त्यामुळे ‘हा वारा’ या गाण्याने आम्हाला जरा उत्साही केले. या गाण्यात आम्ही हसतोय, आनंदी आहोत. आमच्यासाठी हा एक ब्रेक होता.”

‘जून’ या चित्रपटात नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन, निलेश दिवेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.