रेश्मा राईकवार

‘जंगली’

drishyam-hollywood-remake
‘दृश्यम’बद्दल मोठी अपडेट समोर; कोरीअन रिमेकनंतर आता चित्रपटाचा बनणार आता हॉलिवूडमध्ये रिमेक
do-you-know-who-is-this actress
फोटोमध्ये पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? मराठीबरोबर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही कमावतेय नाव
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा
tigmanshu-dhulia-vivek-agnihotri
“असे चित्रपट अत्यंत बेकार…”, तिग्मांशु धुलिया यांची विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका

बॉलीवूडमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके कलाकार आहेत जे खरोखरच मार्शल आर्ट्स आणि इतर स्टंट्स साकारण्याचे प्रशिक्षण घेऊन चित्रपटात स्वत: अ‍ॅक्शनदृश्ये करतात आणि त्यामुळे ती बऱ्याच प्रमाणात खरी वाटतात, निदान पाहावीशी तरी वाटतात. अभिनेता विद्युत जामवाल हे त्यापैकी एक नाव. त्यामुळे ‘जंगली’ चित्रपटाबद्दल बोलताना विद्युत जामवाल आणि त्याची अ‍ॅक्शन पाहणे ही मुख्य पर्वणी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हॉलीवूड दिग्दर्शक चक रसेल यांनी केले आहे. खूप वर्षांनी हिंदीत जंगल, प्राणी आणि माणूस यांना एकत्र आणणारा चित्रपट पाहायला मिळतो आहे आणि शेवटी मराठी प्रेक्षकांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा सावंत ही मराठी अभिनेत्री या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत आहे. प्राथमिक पातळीवर या सगळ्या गोष्टी आपल्याला रुपेरी पडद्यावरच्या या जंगलात शिरायला भाग पाडतात.

‘जंगली’ चित्रपट हा अ‍ॅक्शन आणि नितांतसुंदर हिरव्यागार निसर्गाच्या फ्रेम्सने परिपूर्ण असा आहे, पण या चित्रपटाची कथा अगदीच बाळबोध आहे. अर्थात, परीक्षा संपून सुट्टय़ा सुरू झाल्या असल्याने लहान मुलांना समोर ठेवूनच चित्रपटाची आखणी केली असेल तर त्यात तक्रारीचे काही कारण नाही. अत्यंत साधीसरळ, कुठलेही वळण नसलेली अशी ही गोष्ट आहे. चित्रपटात उल्लेख असल्याप्रमाणे केरळमध्ये कुठेतरी हत्तींचे अभयारण्य आहे. या अभयारण्याची स्थापना करून त्यांची देखभाल करणाऱ्यांचा मुलगा राज (विद्युत जामवाल) जंगलापासून दूर मुंबईत काम करतो आहे. जंगलातच लहानाचा मोठा झालेल्या राजला पुन्हा तिथे परतायची आस आहे, पण वडिलांबरोबर असलेला अबोला हे त्याच्या न परतण्याचे कारण बनते. अखेर, तो या जंगलात परततो आणि नेमके त्याच वेळी जंगलात शिकारी या हत्तींवर नजर ठेवून असतात. आपण हस्तिदंताच्या तस्करीसाठी त्यांची शिकार करत नाही, तर त्या प्राण्यांशी दोन हात करण्यात शिकारी म्हणून मजा येते, असे सांगणारा शिकारी (अतुल कुलकर्णी) आणि त्याचे साथीदार हत्तींना मारतात आणि मग चित्रपटाच्या नायकाचे खरे काम सुरू होते. हत्तींची शिकार करू नका, तस्करी थांबवण्यासाठी मदत करा आणि पुन्हा निसर्गाकडे चला.. अशा प्रकारचे संदेश देणारा ‘जंगली’ माफक मनोरंजन करतो.

‘जंगली’ची खासियत ही विद्युत जामवाल आणि त्याच्या अ‍ॅक्शनदृश्यांमध्येच आहे. राज हा कलरिपयट्टूमध्ये निष्णात आहे. स्वत: विद्युतही या कलेत निपुण आहे, शिवाय कुठलेही केबल्स न वापरता स्टंट करण्याची त्याची शैली यामुळे या चित्रपटातील त्याची तालबद्ध अ‍ॅक्शनदृश्ये आणि बॉलीवूड स्टाइल गुंडांबरोबरची मारामारी हे दोन्ही पाहण्यासारखे आहे. प्रेमकथा नाही, त्यामुळे दोन नायिका असल्या तरी त्यांना गाणी-नृत्य करायला वाव नाही. नाही म्हणायला चित्रपट संपताना एका गाण्यावर त्यांनी ताल धरला आहे. पूजा सावंत अतिशय सहजतेने आणि आत्मविश्वासाने चित्रपटात वावरली आहे. तिला नायकाबरोबर रोमान्स करण्याची संधी चित्रपटात मिळालेली नसली तरी तिची भूमिका यात जास्त महत्त्वाची आहे, हेही नसे थोडके. मक रंद देशपांडे आणि अतुल कुलकर्णी हे दोघेही नेहमीपेक्षा वेगळ्या अवतारात चित्रपटात पाहायला मिळतात, त्यांनी दोघांनीही नेहमीप्रमाणे त्याच ताकदीने त्यांच्या भूमिका केल्या आहेत. कलाकारांबरोबरच चित्रपटाच्या दिग्दर्शनातही वेगळेपणा जाणवतो.

चित्रपटाची कथा केरळात घडते असे दाखवले असले तरी चित्रपट थायलंडमध्ये चित्रित झाला आहे त्यामुळे नितांतसुंदर हिरवीगार वनराई, तलाव, जंगलातील घरे अशा सुंदर फ्रेम्स पाहून डोळे निवतात हेही तितकेच खरे. याचे श्रेय मार्क आयर्विन यांच्या सिनेमॅटोग्राफीलाही आहे. जंगलातील अवाढव्य पण तितकाच प्रेमळ प्राणी म्हणून ओळखले जाणारे हत्ती, त्यांचे कळप, माणसांशी असलेले त्यांचे नाते या सगळ्या गोष्टी चित्रपटात आहेत. चित्रपटात दोन नायिका आहेत, मात्र म्हणून प्रेमकथेकडे वाहवत न जाता केवळ अ‍ॅक्शन आणि मूळ हत्तींची कथा यावरच भर देऊन चित्रपट केल्याबद्दल दिग्दर्शकाचेही कौतुक करायला हवे.

‘द मास्क’, ‘द स्कॉर्पिअन किंग’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या चक रसेल यांच्यासाठी अ‍ॅक्शन ही मोठी गोष्ट नाही, पण जंगलावर आधारित अशी अगदी साधी गोष्ट घेऊन त्याला उत्तम प्रकारे अ‍ॅक्शनची फोडणी देत हिंदी चित्रपट करण्याचे धाडस त्यांनी केले आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनी का होईना बाष्कळ विनोद न करता संवेदनशील पद्धतीने हाताळणी के लेला असा चित्रपट प्रेक्षकांच्या वाटय़ाला आला, हीसुद्धा प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे.

* दिग्दर्शन – चक रसेल

* कलाकार – विद्युत जामवाल, पूजा सावंत, आशा भट, मकरंद देशपांडे, अतुल कुलकर्णी, अक्षय ओबेरॉय