आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्या विशिष्ट क्षेत्रावर उमटवणाऱ्या व्यक्तीला आपण सर्वसाधारणपणे आदर्श व्यक्ती असे संबोधतो. राजकारण, मनोरंजन, क्रीडा, संगीत यांसारख्या विविध क्षेत्रांत अशी असंख्य आदर्श व्यक्तिमत्त्वे होऊन गेली ज्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत नवोदित मंडळी त्या क्षेत्रात मार्गक्रमण करताना दिसून येतात. पण या आदर्श व्यक्तिमत्त्वांचे आयुष्य फार विचित्र असते. त्यांच्या जीवनशैलीचे फार जवळून निरीक्षण केले जाते. समाज त्यांना एका विशिष्ट चौकटीतून पाहतो. आणि एखादी गोष्ट जर त्या चौकटीत बसणारी नसेल तर मात्र त्यांच्याच चाहत्यावर्गाकडून त्यांच्यावर टीकेची लाट उसळते. आजवर हा अनुभव मायकेल जॅक्सन, शेन वॉर्न, मडोना, जस्टिन बीबर यांसारख्या कित्येक कलाकारांनी घेतलेला आहे. अभिनेत्री अम्बर हर्डदेखील सध्या अशाच काहीशा विचित्र परिस्थितीचा सामना करते आहे. बहुधा म्हणूनच तिने या ‘आदर्श’पणाचा आता कंटाळा आला, असे उद्गार काढले आहेत.

चाळीसपेक्षा जास्त यशस्वी व्यक्तिरेखा, शेकडो पुरस्कार, ६० हजारपेक्षा जास्त समाजमाध्यमांचे फॉलोअर्स बाळगणारी ३१ वर्षीय अम्बर हर्ड आज हॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज अनेक नवोदित कलाकार तिला आदर्श मानतात, परंतु अम्बरला आता ही लोकप्रियता नकोशी झाली आहे. सतत तिच्यावर लक्ष ठेवून राहणारे चाहते तिला नकोसे वाटतात. तिच्या लहानातल्या लहान गोष्टीचे ते अनुकरण करतात. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात बोलताना, वागताना तिला फार विचार करून वावरावे लागते. या सगळ्या परिस्थितीमुळे तिचे स्वातंत्र्यच तिच्यापासून कोणी हिरावून घेत असल्याचा भास तिला होतो. म्हणून तिने आता या प्रसिद्धीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अम्बरच्या मते चाहत्यांनी त्यांच्या आदर्श व्यक्तींचे ज्ञान, कर्तृत्व, मेहनत, महत्त्वाकांक्षा या गोष्टींचा आदर्श घ्यावा पण त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावू नये. प्रत्येक व्यक्ती ही आपले शिक्षण, विचारसरणी, संस्कृती व त्यांच्या भवतालची परिस्थिती यानुसार वावरत असते. आणि आदर्श व्यक्तीही याला अपवाद नाहीत. गेल्या काही काळात अम्बरचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेपबरोबर झालेला घटस्फोट, इतर अभिनेत्यांशी तिचे असलेले अनैतिक संबंध, लेट नाइट पाटर्य़ामध्ये घडलेल्या विविध घटना यामुळे अनेकांनी तिच्या जीवनशैलीवर सडकून टीका केली होती. आणि म्हणूनच या तथाकथित आदर्श प्रतिमेतून बाहेर येण्याचा निर्णय तिने घेतला आहे.