१९३६ साली उदयाला आलेल्या ‘डीसी एक्स्टेंडेड युनिव्हर्स’ने सुपरमॅन, बॅटमॅन, वंडर वुमन, फ्लॅश, सुपरगर्ल यांसारख्या एकाहून एक अनोख्या सुपरहिरोंची निर्मिती करत आठ दशकांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. पण अलीकडच्या काळात चाहत्यांच्या मनावरील या सुपरहिरोंची पकड काहीशी ढिली पडत असल्याची खंत ‘सुपरमॅन’ फेम हेन्री कॅविल याने व्यक्त केली. आजवर कॉमिक, कार्टून व मालिका या माध्यमातून अग्रस्थानी असलेल्या डीसीने चित्रपट क्षेत्रात येण्यास काहीसा उशीर केला. त्यामुळे डीसीच्या ‘जस्टिस लीग’ला ‘अ‍ॅव्हेंजर्स’च्या तुलनेत फार प्रभाव टाकता आलेला नाही. सुपरहिरोंचा खरा प्रेक्षकवर्ग लहान मुलं असतात. त्यामुळे त्यांना सहज समजेल असे साधे कथानक चित्रपटांत असणे अपेक्षित असते. ही बाब माव्‍‌र्हलच्या लवकर लक्षात आली आणि त्यांनी त्या अनुषंगाने चित्रपटाची निर्मिती करण्यास सुरुवात केली. माव्‍‌र्हल सुपरहिरो हे काळाशी सुसंगत आहेत. त्यांचा ‘आयर्नमॅन’ विनोदी व मिष्कील आहे. तो आपल्या आकर्षक जीवनशैलीतून तरुणांना आकर्षित करतो. पण दुसरीकडे बॅटमॅन गंभीर आणि तत्त्वज्ञान सांगणारा आहे. लहान मुलं सतत शिक्षकांप्रमाणे मार्गदर्शन करणाऱ्या हिरोंकडे दुर्लक्ष करतात. पण त्याचबरोबर थट्टामस्करी करत त्यांच्या चुकांवर बोट ठेवणारे हिरो त्यांना जवळचे वाटतात. माव्‍‌र्हल चित्रपटातील जवळ जवळ प्रत्येक सुपरहिरो हे एकेका वयोगटाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या कथा त्या विशिष्ट वयोगटात अनुभवाला येणाऱ्या समस्यांचे प्रतिबिंब असते. डीसीने लवकरात लवकर आपल्या चित्रपटांत सुधारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा याच पद्धतीने काम करत राहिल्यास ‘जस्टिस लीग म्हणजे काय?’, या प्रश्नाचे उत्तर गूगलवर शोधावे लागेल, अशी भीती चक्क ‘सुपरमॅन’नेच व्यक्त केली आहे.