अभिनेता राहुल बोसला दोन केळ्यांचं बिल ४४२ रुपये पाठवणाऱ्या चंदीगढ येथील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलला चंदीगढच्या उत्पादन शुल्क विभागाने २५ हजारांचा दंड ठोठावला आहे.  चंदीगढमधील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलने अभिनेता राहुल बोसकडून दोन केळ्यांसाठी चक्क ४४२ रुपये आकारले होते. ज्यानंतर अभिनेता राहुल बोसने सोशल मीडियावर हे बिल दाखवणारा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्या व्हिडिओमुळेच हे प्रकरण उघडकीस आलं.

राहुल बोसच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सध्या चंदीगढमध्ये सुरु आहे. त्यामुळे राहुल चंदीगढमधील जेडब्ल्यू मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. या हॉटेलमध्ये सकाळच्या वेळात राहुल वर्कआऊट करत असताना त्याने हॉटेलकडे नाश्त्यासाठी २ केळी मागविली होती. विशेष म्हणजे या दोन केळ्यांसाठी हॉटेलने आकारलेलं बिल पाहून राहुल चक्रावून गेला.  ज्यानंतर त्याने काय घडले ते सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या सगळ्या प्रकरणाची दखल पंजाब सरकारने घेतली आहे. तसेच मॅरिएट हॉटेलला २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे राहुल बोसला दोन केळ्यांसाठीचे बिल ४४२ रुपये पाठवणं या हॉटेलला चांगलेच महागात पडले आहे.

राहुल बोसचा व्हिडिओ

राहुल बोसने जेव्हा यासंदर्भातला व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकरणाची दखल पंजाब सरकारच्या उत्पादन शुल्क विभागानेही घेतली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त मनदीप सिंग ब्रार यांनी दिले होते. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आता मॅरिएट हॉटेलला २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. फळांवर या हॉटेलने जीएसटी लावलाच कसा काय? हे आम्हाला समजले नव्हते त्यानंतर आम्ही या प्रकरणी चौकशी केली आणि राहुल बोसला दोन केळ्यांचे बिल ४४२ रुपये पाठवणाऱ्या मॅरिएट हॉटेलला २५ हजारांचा दंड ठोठावला असेही ब्रार यांनी सांगितले.