|| महेंद्र पवार

शालेय रंगभूमीच्या क्षेत्रात फार महत्त्वाचे योगदान करणारे शिक्षक ज्योतिराम कदम यांचे नुकतेच निधन झाले. शालेय रंगभूमी ही प्रामुख्याने शिक्षकांची रंगभूमी असते. म्हणजे तिचे कर्ताकरविता शिक्षकच असतात. ते अपवादात्मक नाट्यअभासक असतात. शाळेतल्या मुलांचे नाटक बसवणे ही त्यांच्यावर बऱ्याचदा सक्तीची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांची शालेय नाटकाची व्याख्या ही क्रमिक पुस्तकातील एखाद्या धड्याचं संवादरूपात परिवर्तन यापलीकडे जात नाही. अनेकदा त्यातले संवाद हे मूळ धड्यातलेच असतात. त्याला कथन व निवेदनाची जोड देऊन नाटक तयार केले जाते.

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र

८०-९०च्या दशकांत सुधा करमरकरांची ‘लिट्ल थिएटर’, अरविंद वैद्य यांची ‘कुमार कला केंद्र’, ‘बालकनजी बारी’ या आणि अशा शालेय नाट्यस्पर्धा होत असत. त्यात बालमोहन विद्यामंदिरच्या विद्याताई पटवर्धन, पार्ले टिळक विद्यालयाच्या मृण्मयी बारपांडे, छबिलदासचे विलास जोशी, नवभारत विद्यालयाचे कड सर, शिरोडकर हायस्कूलचे तानाजी परब, गिरगावातील चिकित्सक समूहाच्या शिरोळकर हायस्कूलचे नामजोशी सर असे नाट्यपे्रमी शिक्षक या स्पर्धांमध्ये सहभागी होत असत. त्यात आणखी एक नाव गोवले गेले ते परळच्या शिरोडकर हायस्कूलमधील ज्योतिराम कदम सरांचे!

ज्योतिराम कदम सरांनी स्पर्धेसाठी बसवलेलं ‘सतरा रत्नाचा वग’ हे पहिलंच नाटक. आणि त्यांना पदार्पणात यशही मिळालं. यानंतर त्यांनी स्वत: बालनाट्य लिहायला सुरुवात केली. त्यांचं पहिलं बालनाट्य होतं- ‘काखेत कळसा गावाला वळसा.’ या वगनाट्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त झाली. त्यात मुकुंद माडेकर, श्याम भोर, दत्तात्रय उदास, सुनीता वाडे आणि सुनील गुप्ते हे कलाकार होते. यापैकी सुनील गुप्ते पुढे डॉक्टरेट करून अमेरिकेत स्थायिक झाला आणि तिथेही सरांनी दिलेला नाट्यवारसा पुढे नेण्यासाठी तो प्रयत्नशील राहिला. ‘महाराष्ट्र विश्व’ या मराठीभाषिकांच्या मंडळातर्फे ‘अलीबाबाची गुहा’ हे नाटक त्याने सादर केलं; ज्याचे भारतातही त्याने प्रयोग केले.

नगर जिल्ह्याातील कर्जत तालुक्यातल्या दगडी बारड या दुष्काळी गावात जन्मलेल्या ज्योतिराम कदम यांचे वडील मुंबईत हमालाची नोकरी करीत. त्यांचे वास्तव्य भायखळ्याला होते. तिथल्या महापालिका शाळेत आणि पुढे परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये ज्योतिराम कदमांनी अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आपले शालेय शिक्षण त्यांनी शिकवण्या व मोलमजुरी करूनच केले. नगरला ते हिंदी विषय घेऊन प्रथम श्रेणीत पदवीधर झाले. त्यानंतर सहज एकदा ते आपल्या जुन्या शाळेतील शिक्षकांना भेटायला मुंबईत आले असताना त्यावेळचे शाळेचे मुख्याध्यापक बेरी यांनी त्यांना आमच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करणार का, असं विचारलं आणि ते लगेच ‘हो’ म्हणाले. तेव्हापासून कदम सर शिरोडकर हायस्कूलमध्ये नोकरी करू लागले. त्यांचे मामा भजनी बुवा होते. त्यांना लोककलेची आवड होती. मामांबरोबर राहत असल्याने त्यांना लोककलेची आवड निर्माण झाली. शाळेतील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांत कदम सर आघाडीवर असत. शाळेच्या बालनाट्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. शाळेचे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने ते विविध कार्यक्रम सादर करीत. शाहीर खामकर मंडळीच्या कलापथकातही  ते काम करत असत. त्यांना विनोदाची चांगली समज होती. त्यामुळे ते कलापथकात अल्पावधीतच प्रसिद्ध झाले.

नाट्यनिर्मितीसाठी आवश्यक सर्व अंगांची माहिती ज्योतिराम कदम यांना होती. त्यांच्या नाटकांतून ते प्रकर्षाने जाणवे. त्यांची ‘केल्याने होत आहे रे!’, ‘आम्ही आपले रंगरंगीले’, ‘खोट्याच्या कपाळी गोटा’, ‘नारद झाला गारद’, ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’, ‘माझं पाखरू’,‘एकरूप होऊ सगळे’ यासारखी अनेक बालनाट्ये त्यांनी सादर केली.

नाटकाचा विषय मुलांच्या शालेय जीवनाशी संबंधित हवा हे तर खरंच; पण त्याचबरोबर शाळा मुलांवर ज्या प्रकारचे संस्कार करू इच्छिते त्याला तो पूरकही असायला हवा. नाटकाची भाषा, संवादांतील ठसका, पात्रांचे स्वभावरेखाटन ही भाषिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये मुलांना उलगडून दाखवणे शिक्षकांना नित्याच्या चौकटीत शक्य नसते. मात्र, ज्योतिराम कदम याला अपवाद होते. त्यांची बालनाट्ये शालेय रंगमंचापुरतीच सीमित न राहता सर्व तऱ्हेच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत.

त्यांच्या ‘केल्याने होत आहे रे!’ या बालनाट्यासाठी १९८२ साली मुंबई आकाशवाणी केंद्राला सर्वोत्कृष्ट बालनाट्याचा पुरस्कार प्राप्त झाला. राष्ट्रीय स्तरावर आकाशवाणीला पहिल्यांदाच हे असे यश मिळाले होते. विशेष म्हणजे आकाशवाणीच्या सर्वभाषिक केंद्रांतून हे  बालनाट्य सर्वोत्कृष्ट ठरले होते. कारण ते ज्योतिराम कदम यांनी अनेक वर्षं मुलांच्या सहवासात राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या व्यथा त्यांच्याच भाषेत मांडल्या होत्या. या बालनाट्याचं अतिशय प्रयोगशील सादरीकरण त्यांनी केलं होतं. तेही लोककलेच्या माध्यमातून!

ज्योतिराम कदम त्यांनी बालनाट्यांचा एक वेगळा बाज रंगभूमीला दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच चित्रपती व्ही. शांताराम यांनीही त्यांचं कौतुक केलं होतं. बाळासाहेबांनी तर या बालनाट्याचे प्रयोग सगळ्या शिवसेना शाखांमधून करावेत असा आदेशच दिला होता. शाळेमध्ये १४ वर्षं सेवा करून ते पुण्याच्या बालभारतीत निर्माता म्हणून गेले. तिथे त्यांनी सुमारे साडेपाचशेहून अधिक चित्रफिती तयार करून वेगवेगळे विषय हाताळले. तिथेही त्यांनी आपला ठसा उमटवला. तिथून निवृत्त झाल्यानंतरही त्यांची रंगभूमीची सेवा सुरूच होती. त्यांच्या मागदर्शनाखाली घडलेल्यांमध्ये विकास कदम, दीपाली शेलार-विचारे, देवेंद्र शेलार, संजय खापरे या रंगकर्मीची नावे घेता येतील. गावागावांत जाऊन बालरंगभूमीबद्दल मुलांना माहिती देणे आणि त्यांच्या कार्यशाळा घेण्याचे त्यांचे काम निरंतर चालूच होते. त्यांनी गरीब मुलांसाठी स्वत:च्या खिशातले पैसे खर्च करून अभिनय कार्यशाळा घेतल्या. शासनाने त्यांची साहित्य संस्कृती मंडळ व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती करून त्यांचा सन्मान केला होता. गेली ३५ वर्षे बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या ‘रविकिरण मंडळा’चे ते एक आधारस्तंभ होते. असा हा रंगकर्मी! प्रसिद्धीपासून सदैव दूर राहिलेल्या आणि केवळ शालेय रंगभूमीशी एकनिष्ठ असलेल्या ज्योतिराम कदम यांचे योगदान म्हणूनच महत्त्वाचे ठरते.