मराठी मालिका बघणाऱ्या मुलींना त्याचा चेहरा कमालीचा इनोसंट वाटतो. ‘कसला गोड आहे हा’ हे शब्द मुलींच्या ओठांवर रेंगाळतात.  ‘का रे दुरावा’ या मालिकेतील जय म्हणजेच सुयश टिळक सध्या तरुण मुलींमध्ये कमालीचा लोकप्रिय झालाय. असं म्हणतात की मुलींना केवळ सिक्स पॅक असलेले अभिनेते जास्त भावतात. मात्र, सुयशबाबतीत अगदी उलट आहे. त्याचे काही सिक्स पॅक्स नाहीत तरीही तो अनेक मुलींच्या मनावर राज्य करतो. खुद्द सुयशलाही सिक्स पॅक्स वेड नाही.
काही दिवसांपूर्वी सुयशने एका संकेतस्थळाला मुलाखत दिली होती. त्यावेळी सुयशने आपल्याला सिक्स पॅकचे वेड नसले तरी निरोगी राहण्यास आवडते असे सांगितले. तो म्हणाला की, निदान सहा-सात तासांची चांगली झोप मिळावी याकडे माझा कल असतो. जीम किंवा जॉगिंगला जाण्यासाठी वेळच मिळत नसल्याने मी थोडावेळ व्यायाम करणे पसंत करतो. सिक्स पॅक अॅब्ज बनवण्यात किंवा जीममध्ये जाऊन कठीण व्यायाम करण्यात मला अजिबात रस नाही. मी खूप पाणी पितो आणि घरचं जेवण जेवतो. योग्य वेळी जेवण आणि तिखट, तेलकट पदार्थ टाळण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो.
सतत शूटींगमुळे आपल्या वैयक्तिक जीवनशैलीतही बराच फरक पडल्याचेही सुयश सांगितले. आपले संपूर्ण आयुष्य हे कामाने व्यापलेले आहे. त्यामुळे त्याचा आपल्या जीवनशैलीवरही परिणाम होतो. माझे कुटुंब पुण्यात राहते तर गेले काही वर्ष मी मुंबई राहत आहे. त्यामुळे मला सतत पुणे-मुंबई असा प्रवास करावा लागतो. माझ्या शूटींगच्या वेळा नियमित नसल्यामुळे घरच्या बहुतेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही आणि मित्रमंडळींचीही भेट होत नाही, असे सुयश म्हणाला.
(छाया सौजन्यः सुयश टिळक फेसबुक)