रॅप हा आजच्या तरुणाईच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आजवर इंग्रजी आणि हिंदी गाण्यांमधून ऐकू येणारा हा संगीत प्रकार आता मराठीमध्येही हळूहळू रुजु लागला आहे. आता मराठी चित्रपटांमध्येही रॅप संगीताचं वारं शिरु लागलं आहे. त्यामध्ये विविध प्रयोग देखील केले जात आहेत. असाच एक लक्षवेधी प्रयोग काही मराठी तरुणांनी केला आहे. त्यांनी मराठीतील पहिलं देशभक्तीपर रॅप साँग तयार केलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी देशातील सामाजिक समस्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या गाण्याचं नाव देखील त्यांनी ‘का?’ असंच ठेवलं आहे.

अलिकडेच प्रदर्शित झालेलं हे रॅप साँग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ऋषिकांत राऊत, किरण कुंभार (रे मार्शल) आणि सुबोध जाधव (जे सुबोध) या तिघांनी मिळून हे गाणं तयार केलं आहे. रॅपर रे मार्शल आणि जे सुबोध यांनी हे गाणं गायलं आहे. शंतनु बोरकर आणि अन्वय सातोसकर या दोघांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. तसंच स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत झळकलेल्या अभिनेता रोशन विचारे याने या गाण्यामध्ये अभिनय केला आहे. हे गाणं सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.