गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी जोडप्यांच्या नात्यात दुरावा आला. २०१६ या वर्षात याचा प्रत्यय अनेकांनाच आलाही आहे. बऱ्याच वर्षांपासून चालत आलेल्या वैवाहिक नात्यात ऊद्भवलेल्या काही प्रसंगांमुळे काही प्रसिद्ध बी टाऊन जोड्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. इशाच जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान. दोन वर्षांपूर्वी हृतिक आणि सुझानच्या वैवाहिक नात्यात दुरावा आल्यामुळे या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांना त्यांच्या या निर्णयाने धक्काच बसला. पण, वैवाहिक नात्यात दुरावा आला असला तरीही हृतिक आणि सुझान यांच्यातील मैत्री आजही टिकून आहे. सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारे त्यांचे फोटो तरी निदान हेच सिद्ध करत आहेत.

ह्रतिक रोशन आणि सुझान यांचा घटस्फोट झाला असला तरी ते दोघे चांगले मित्र आहेत. हे पुन्हा एकदा पाहावयास मिळाले. ह्रतिकच्या वाढदिवसात सहभागी होऊन सुझानने वैवाहिक संबंध तुटल्यानंतरही मैत्रीचे नाते कायम असल्याचे दाखवून दिले. पण, आता त्यांचा जो फोटो समोर आलाय तो पाहून तर त्यांच्यातील प्रेमसुद्धा अजूनही तसेच कायम असल्याचे दिसते. हृतिकचा आगामी काबिल चित्रपट पाहिल्यानंतर सुझानने हृतिकसोबतचा तिचा एक फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देत आपल्याला हृतिकवर गर्व असल्याचे तिने म्हटले आहे.

अभिनेता ह्रतिक रोशन बऱ्याचदा आपल्या मुलांसोबत सुट्टीचा आनंद साजरा करताना दिसतो. रिहान आणि रिधान या आपल्या मुलांसोबतची छायाचित्र ह्रतिक ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल साइट्सवर प्रसिद्ध करत असतो. काही दिवसांपूर्वीच रिहान आणि रिधान यांच्यासह ह्रतिक स्वित्झर्लंडला गेला होता. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी ‘काबिल’ चित्रपटाबद्दल बॉलिवूडमध्ये सध्या अनेक चर्चा रंगत आहेत. आगामी चित्रपटामध्ये हृतिक यामी गौतमीसह स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात अंध व्यक्तिच्या भूमिकेत असणारा हृतिक आपल्या प्रेयसीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दुश्मनांशी चार हात करताना दिसणार आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित काबिल चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ४२ वर्षीय हृतिकने बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती.