|| सुहास जोशी

नेहमीपेक्षा जरा वेगळा विषय, नयनरम्य आणि हटके असे चित्रीकरण स्थळ अशी काही ठळक वैशिष्टय़ असलेली वेबसीरिज खरं तर आणखी सरसपणे मांडता आली असती. पण तसं झालेलं दिसत नाही. वेगळेपणाच्या आकर्षणातून सीरिज पाहिली जाते, पण त्यात गुंतायला होत नाही. आणि सीरिज संपल्यानंतर त्यातून वेगळं काही पाहायला मिळाल्याची जाणीवदेखील होत नाही. ‘झी ५’वरील ‘काफीर’ या वेबसीरिजबाबत असंच काहीसं झालं आहे.

जम्मू काश्मीरमधील तुरुंगात प्रदीर्घ काळ अडकून पडलेले पाकिस्तानी नागरिक या मुद्दय़ाला हात घालणारं हे कथानक आहे. मात्र त्याचं स्वरूप केवळ त्यापैकी एका नागरिकापुरतंच मर्यादित आहे. कैनाझ अख्तर ही भारतीय हद्दी विनापरवाना ओलांडल्याच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा भोगत असते. मात्र तिच्यावर दहशतवादी असल्याचादेखील आरोप लावलेला असल्याने विनापरवाना सीमा ओलांडल्याची दीड वर्षांची शिक्षा संपल्यानंतरदेखील ती तुरुंगातच अडकून पडते. त्या सात वर्षांत तुरुंगातच ती एका मुलीला जन्म देते. काश्मिरमध्ये कार्यरत असलेल्या दूरचित्रवाणीचा पत्रकार वेदांत राठोडला हे प्रकरण कळते. तो तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करतो. सेनादलात असणाऱ्या वेदांतच्या दोन्ही भावांपैकी एकाचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला असतो. वडील निवृत्त पोलीस अधिकारी असतात. अशा वातावरणात कैनाझला पुन्हा पाकिस्तानात जाण्यासाठी मदत करणाऱ्या वेदांतचा लढा म्हणजे ही मालिका.

कैनाझचे पूर्वायुष्य, त्यातील गुंतागुंत, तिची सहा वर्षांची मुलगी, वेदांतचा घरी होणारा संघर्ष, दोन देशांमधील बिघडणारे संबंध असं बरंच काही यात भरलेलं आहे. पण तरीदेखील कथानक ज्या संथगतीने पुढे सरकत राहतं त्यातून या सर्वाचा मिळून जो एक प्रभाव जाणवायला हवा तसा जाणवत नाही. किंबहुना सतत काही मुद्दे सुटल्याची जाणीव अधिक तीव्रतेने होत राहते.

काश्मीर प्रश्नाच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळे मुद्दे चित्रपटांमध्ये यापूर्वी हाताळले गेले आहेत. पण मालिकांसाठी तसा हा विषय नवीनच, त्यातही वेबसीरिज असल्यामुळे येथे असा विषय हाताळायची संधी मिळाली आहे. त्या संधीचा वापर सीरिजकर्त्यांनी केला ही नक्कीच चांगली बाब आहे. पण त्याला पुरेसा न्याय देऊन एक प्रभावी मांडणी मात्र झालेली नाही. काश्मीरचे सौंदर्य मोठय़ा आणि छोटय़ा पडद्यावर यापूर्वी कैकवेळा पाहायला मिळालं आहे. पण येथे काश्मीरच्या नयनरम्य सौंदर्यात वगैरे फार न अडकवता केवळ पाश्र्वभूमी म्हणून यामध्ये उत्तम वापर झाला आहे हे येथे मुद्दाम नमूद करावे लागेल. अन्यथा अशा वेळी कॅमेरा उगाचच डोंगरदऱ्यात भटकत राहतो. त्याउलट शेवटच्या काही भागांत कैनाझची मन:स्थिती चितारण्यासाठी ही पाश्र्वभूमी चपखलपणे वापरली जाते.

कैनाझचे काम करणारी दिया मिर्झा ही भूमिकेसाठी बरी निवड आहे. कैनाझचे संवाद तुलनेने कमीच आहेत, तिची सारी भूमिका ही देहबोलीतूनच अधिक व्यक्त होते. दिया मिर्झाने ते काम उत्तम केलं आहे, पण संवाद म्हणताना तिचा सारा प्रभाव निघून जातो. वेदांत व इतर कलाकारांचं काम फार काही दखल घ्यावे असे विशेष प्रभाव पाडणारे नाही.

तशी ही कथा बरीच जुनी म्हणजे २००५च्या आसपासची. त्यामुळे अनेक बाबींचा विचार त्या काळात जाऊ न करावा लागतो. दूरचित्रवाणीचा मर्यादित विस्तार, दळणवळणाची मर्यादित साधनं अशा अनेक बाबी त्यामध्ये येतात. पण त्याच वेळी कथानकाच्या सोयीसाठी म्हणून काही ठिकाणी घेतलेले स्वातंत्र्य कधी कधी विसंगतीकडेदेखील झुकू पाहते. त्यातच कथानकात काही पात्रं विनाकारण डोकावून जातात. कथेतील त्यांचं नेमकं स्थान जाणवत नाही. तसेच काही प्रसंगदेखील. एका क्षणात मतपरिवर्तन होणे वगैरे बाबी काल्पनिक कथानकात होतच असतात, पण येथे बऱ्याच गोष्टी या वास्तवतेला धरून मांडण्याचा प्रयत्न दिसत असताना हे असे क्षणात होणारे बदल खटकतात. अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक घेतलेले पॉजदेखील खटकतात. कैकवेळा पुढे काय घडणार याचे अंदाज खरे ठरत जातात, अशा वेळी कथेतील स्वारस्य कमी होते.

एकूण या कथेत बऱ्याच मुद्दय़ांचा विचार झालेला आहे. मात्र ते सर्व तेवढय़ा ताकदीने न मांडणे ही या मालिकेची कमकुवत बाजू आहे. एकूणच मांडणीवर अधिक प्रयत्न केला असता तर कदाचित याहून दर्जेदार काहीतरी पाहायला मिळालं असतं.

काफीर

ऑनलाइन अ‍ॅप – झी ५

सीझन १