संदिप खरात निर्मित काळ या चित्रपटाची गेल्या बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरु आहे.अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. काळजाचा थरकाप उडविणारा हा चित्रपट येत्या २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होत असून केवळ भारतातच नाही, तर रशियामध्येही प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे रशियामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे.
रशियातील ३० शहरांमध्ये तब्बल १०० चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसंच चौथ्या बॉलिवूड चित्रपट महोत्सवातदेखील काळच्या प्रीमिअरचं आयोजन केलं जाणार आहे. ‘काळ’चा ट्रेलर पाहिल्यानंतर रशियातील कंपनीने आणि चित्रपट महोत्सव आयोजकांनी निर्माते आणि फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना रशियातील प्रदर्शनासाठी विनंती केली.

“चित्रपटाचा विषय आणि चित्रपटाची हाताळणी आयोजकांना आवडली. अशा विषयांना रशियामध्ये खूप मोठी मागणी असते. त्यानंतर या चित्रपटाचे रशियातील प्रदर्शन नक्की झाले. आमच्यासाठी ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे की रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट आमचा आहे,” असं फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर म्हणाले.

‘काळ’चे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन डी. संदीप यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर तसेच नितिन प्रकाश वैद्य आणि डी संदीप यांची आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

या चित्रपटाची कथा ही अलौकिकत्वाच्या (पॅरानॉर्मल गोष्टी) संकल्पनेवर आधारित असून त्यामुळे ती इतर चित्रपटांच्या तुलनेत वेगळी ठरते. इतर कोणत्याही चित्रपटात अशाप्रकारच्या विषयाला हात घातला गेला नव्हता. रशिया आणि सीआयएसमध्ये अशाप्रकारच्या विषयांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. याच कारणांसाठी या चित्रपटाची या महोत्सवासाठी निवड झाली आहे. “या चित्रपटाची संकल्पनाच आंतरराष्ट्रीय स्तरावर अपील होईल अशी आहे. अगदी गाजलेल्या ‘ब्लेअर विच प्रोजेक्ट’च्या पठडीतील हा चित्रपट आहे. आम्ही जेव्हा निर्मात्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनीही अगदी ताबडतोब रशियातील प्रदर्शनासाठी हो म्हटले. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की चित्रपटाला भारतात फार मोठे यश मिळेल आणि तो चांगला व्यवसाय करेल,” असे उद्गार रशियातील कंपनी ‘ईनसाईड प्रमोशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तातीयाना मिशेन्को यांनी काढले.