सिनेमा
प्रदीप आवटे – response.lokprabha@expressindia.com

पा रंजित यांचा ‘काला’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. संस्कृतीच्या ठेकेदारांना, माझाच धर्म-संस्कृती श्रेष्ठ मानणाऱ्या वर्चस्ववादी मनोवृत्तीला विरोध करत परस्परांच्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे, असं विधान करणारा हा सिनेमा ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे.

त्यानं साठी गाठलीय, पण तो आपल्या नातवांच्या वयाच्या पोरांमध्ये क्रिकेट खेळतो आणि आऊट झाल्यावर पोरांसारखंच नो बॉल नो बॉल म्हणून गोंधळ घालतो. अजूनही बायकोभोवती नव्या नवरीसारखा पिंगा घालतो आणि एखाद्या मध्यमवर्गीय माणसासारखा तिला जाम टरकून असतो. पण बाहेर रावडी असा की ठार रात्री शत्रूने घेरलं असतानाही लुंगीचे एक टोक उचलत तो ‘क्या रे ?’ म्हणाला की भल्या भल्यांची पुंगी वाजते. तो निडरपणे शत्रूच्या गोटात एकटा जातो आणि वीस-एकविशीतील प्रेयसीला पाहून तो टीनएजरसारखा बावरा होतो. त्याचं जगणं असं लख्ख. त्याच्या डाव्या हातावर गोंदलेल्या नावासारखं स्वच्छ आहे, खुली किताब आहे. काला ऊर्फ कारीकालन त्याचं नाव. हे सारं पठडीतलं वाटलं तरी ‘काला’ पठडीतील फिल्म नाही. तो चक्क वाइड बॉल आहे आणि तरीही आपली मिडल स्टम्प गुल करणारा. पा रंजित यांचा ‘काला’ हा चित्रपट आपल्या सांस्कृतिक राजकारणातील एक महत्त्वाची घटना आहे. धारावीतील भूखंडाच्या मालकीवरून एक राजकीय संघर्ष उभा राहतो आणि त्याच्या भोवती हा चित्रपट एक आधुनिक दंतकथा वाटावी, असं महाकाव्य रेखाटत जातो.

काला आणि हरीदादा अभ्यंकर यांच्यामधील म्हणजे वरवर पाहता एक झोपडपट्टीतील दादा आणि राजकारणी यांच्यातील या चित्रपटात रंगवलेला हा संघर्ष खरं म्हणजे आपला विद्यमान सांस्कृतिक संघर्ष आहे. बहुजन समाजातील प्रतीके आणि प्रतिमा प्रथमच मुख्य प्रवाहातील चित्रपटामध्ये इतक्या सुस्पष्टपणे व्यक्त झाल्या आहेत. या चित्रपटाने आपल्या समाजाच्या सांस्कृतिक सीमारेषा स्पष्टपणे प्रथमच दाखवल्या आहेत. आणि या सीमाप्रदेशातील भूतकाळातील आणि आणि वर्तमानकाळातील संघर्षांचे चित्र रेखाटताना भविष्यकाळातील संघर्षांचे सूचनही चित्रपट करतो. खरं म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाने पाहिला पाहिजे आणि त्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये दडलेला अर्थ समजावून घेतला पाहिजे. काला ‘वॉचिंग बिट्वीन द फ्रेम्स’ पाहिला तर त्याचा मथितार्थ नेमका कळू शकेल.

‘फँड्री’सारख्या चित्रपटांनी समाजातील परिघावरील जनसमूहाचा हुंकार प्रथम मांडला, तो अधिक बुलंद आणि अधिक टोकदार करण्याचे काम ‘काला’ने केले आहे! मुळात परिघावरील हा जनसमूह ज्या आक्रमकतेने आणि मनपूर्वक ‘काला’चे स्वागत करताना दिसतो आहे त्याचेही कारण आपण लक्षात घ्यायला हवे. आजवर आपल्या समाजात मूठभर उच्चवर्णीयांचे सांस्कृतिक वर्चस्व राहिले. कलेची अवघी प्रतिमासृष्टी, अवघे सौंदर्यशास्त्र मूठभरांच्या सांस्कृतिक धारणांबरहुकूम आखले गेलेले आहे. या देशातील बहुजनांची सांस्कृतिक प्रतीके, प्रतिमासृष्टी कधीही मुख्य प्रवाहातील साहित्य आणि चित्रपटात ठळकपणे येताना दिसली नाही. ‘काला’मध्ये हे सुस्पष्टपणे घडताना दिसते. यातला प्रोटागोनिस्ट मूलतत्त्ववादी शक्तींनी जाळलेल्या उद्ध्वस्त बौद्ध विहारासमोर उभा राहून क्रांतीची, संघर्षांची घोषणा करतो तेव्हा ती समाजातील सांस्कृतिक युद्धाची ललकार असते. समाजाच्या तळाशी असणाऱ्या सामाजिक स्तरात जी उलथापालथ होते आहे, त्यांची स्वप्ने, आकांक्षा आणि वास्तव यांच्या संघर्षांतून येऊ घातलेल्या सांस्कृतिक भूकंपाचे सजलेले नेपथ्य हा चित्रपट ठळकपणे चित्रित करतो.  भविष्याचे सूचन करणारा हा चित्रपट म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकाने गांभीर्याने पाहिला पाहिजे आणि सामाजिक सांस्कृतिक उद्रेकाचा हा लाव्हा एक नवी भूमी निर्माण करण्यासाठी उसळतो आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. या उद्रेकाला विघातक वळण लागू नये, यासाठी आवश्यक पावले उचलण्याची जबाबदारी समाजघटक म्हणून आपल्या सर्वाची आहे.

मूठभरांचे फसवे मूलतत्त्ववादी राजकारण आणि बहुजनांचे सर्वसमावेशक समाजकारण यांचा एक भव्य पट हा चित्रपट उभा करू पाहतो. श्रम आणि श्रमिकांचे अवमूल्यन करून त्यांना हीन लेखू पाहणाऱ्या (‘धारावी में तो साठ परसेंट क्रिमिनल है,’ ही सामाजिक समज असणारी माणसं आपल्याला चित्रपटात दिसतात. ) व्यवस्थेविरुद्ध पा रंजित यांचा ‘काला’ एल्गार पुकारतो. आणि हा एल्गार पुकारताना तो काही बहुजन हितकारक समाजमूल्ये छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून अधोरेखित करत जातो. जमिनीच्या हक्कासाठीची लढाई ही या संघर्षांच्या केंद्रस्थानी आहे.

पहिला ठळक जाणवणारा विशेष म्हणजे, बहुजनांचे आत्मभान रसरशीतपणे मांडणारा हा चित्रपट कमालीचा स्त्रीवादी आहे. या चित्रपटातील प्रत्येक स्त्री व्यक्तिरेखा कमालीची खंबीर आहे, मग ती कालाची पत्नी असणारी सेलवी असेल अथवा झरिना असेल. लेनिनची गर्लफ्रेण्ड असणारी तुफानी तर नावाप्रमाणेच तुफानी आहे. कालाची तरुणपणीची प्रेयसी झरिना जेव्हा कथानकात अवतरते तेव्हा ज्या सहजतेने कालाची पत्नी सेलवी आपल्यावरसुद्धा प्रेम करणारा एक जगन्नाथ नावाचा मुलगा होता असं कालाला सुनावते तेव्हा तो केवळ विनोद असत नाही. हा छोटा प्रसंग हसत हसत स्त्री-पुरुष समतेची गोष्ट करतो. अखेरच्या आंदोलनात सर्वासाठी जेवणाची व्यवस्था करताना, ‘खाना बनाना सिर्फ औरतोंका काम नहीं’, हे काला आपल्या कार्यकर्त्यांना ठणकावून सांगतो. आपली पॅन्ट फेडलेली असतानाही पोलिसांना भिडणारी तुफानी आपल्या अनाटॉमीच्या सीमा सहज ओलांडताना दिसते. बहुजन चळवळींनी या स्त्रीवादाच्या फुटपट्टीवर स्वतला घासून पाहायला हवे. आपल्या कष्टकरी आयाबहिणींना ही मुक्ती सहजासहजी मिळते का, हा विचार आपल्याला अंतर्मुख करतो.

सर्व जातधर्माना जोडणारे समाजजीवन, सर्वाची परस्परांशी असलेली नाळ, त्यातून निर्मळ झऱ्यासारखे उगवणारे रॅप संगीत हे सारे युटोपिक वाटावे इतके वेडावणारे आहे. हिंदू-मुस्लीम – सवर्ण- अवर्ण असे ध्रुवीकरण करण्यासाठी प्रस्थापित राजकारण क्रियाशील असताना आपण ही परस्परांमध्ये गुंतलेली आपली मुळे सांभाळली पाहिजेत, असा संदेशही ‘काला’ देतो आणि म्हणूनच धर्माच्या आधारावर धारावीच्या जनतेमध्ये फूट पाडण्याचा मूलतत्त्ववादी शक्तीचा कट यशस्वी होऊ शकत नाही.

गोवंश हत्या प्रतिबंधाच्या आजच्या काळात बीफ, बडे का मांस यांची चर्चा चित्रपटात येते. शाकाहारी असणाऱ्या आपल्याच मुलाची थट्टा सेल्वी करते.  खाण्यापिण्यात आपल्या प्रत्येक समाजगटाचे वेगळेपण आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. भारतासारख्या खंडप्राय देशात जागतिकीकरण आणि उजव्या शक्ती यांच्या युतीने येऊ पाहणारे सांस्कृतिक सपाटीकरण धोकादायक आहे. हा धोका हा चित्रपट स्पष्टपणे दर्शवितो.

सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटातील नायकाचे राजकारण आणि समाजकारण. ‘मेरे लोगोंका स्वार्थ ही मेरा जीवन है’, असं म्हणणारा कालासारखा पुढारी हे बहुजन चळवळीने खूप काळापासून जपलेले स्वप्न आहे. पण दुर्दैवाने तत्त्वाशी प्रतारणा करून सत्तेच्या वळचणीला जाणाऱ्या नेत्यांनी बहुजन चळवळ संपुष्टात आणण्याचाच जणू घाट घातला आहे. ‘काला’मधील रजनीकांतने उभ्या केलेल्या पात्राच्या रूपाने उभे राहणारे बहुजन नेतृत्व हा वर्तमानातील दाहक वास्तवावरील मोठा दिलासा आहे आणि म्हणूनच त्याच्या प्रत्येक एन्ट्रीसोबत थिएटर शिट्टय़ांनी दणाणून निघते. त्या शिट्टय़ांचा आवाज आणि अर्थ बहुजनांचे नेते म्हणवणाऱ्यांच्या कानापर्यंत पोहोचावेत, ही या चित्रपटाची सुप्त इच्छा आहे, हेही नाकारता येणार नाही. त्यामुळे हा चित्रपट केवळ मूलतत्त्ववादी शक्तींना विरोध करतो असे नाही तर त्याच वेळी तो बहुजन चळवळीला तिच्या खऱ्याखुऱ्या उद्दिष्टांची आणि सामर्थ्यांची आठवण करून देतो. अनेक लहान लहान प्रसंगांतून तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयीची आठवण आपणाला देतो. पाया पडण्याच्या पद्धतीला विरोध करत हस्तांदोलनातील समानता जाता जाता आपल्याला सांगतो.

राम आणि रावणाचा आधुनिक काळातील संघर्ष मांडत एक नवी लोककथा चित्रमय शैलीत आपल्या समोर येते. ‘काला’ रावण आणि रामाच्या पारंपरिक नात्याला उलटंपालटं करत द्रविड संस्कृतीतील रावणाला नव्या रूपात पेश करतो. म्हणूनच रावण वंचितांच्या प्रत्येक चेहऱ्यात वावरू लागतो. या रावणाळलेल्या गर्दीत राम हरवतो आणि श्रमाचा काळा रंग, रक्ताचा लाल रंग रंगपंचमी खेळत आभाळाच्या निळ्या रंगाला गवसणी घालू लागतात. घामातून उगवलेले वंचितांचे सौंदर्यशास्त्र रॅपच्या तालावर वस्तीभर नाचू लागते. वंचितांच्या हातात इतिहासाचे भान आणि वर्तमानाचा धडा ठेवणारा ‘काला’ व्यावसायिक चित्रपट आहे का? नक्कीच आहे, पण त्यामुळे त्याचे महत्त्व उणावत नाही. व्यावसायिकतेच्या अपरिहार्यतेतही तो करत असलेले विधान अधिक महत्त्वाचे आहे. आपापले चष्मे काढून आपण ते उघडय़ा डोळ्यांनी वाचले पाहिजे. हा दोन संस्कृतींचा संघर्ष तर आहेच, पण या दोन संस्कृती जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामाचे उद्घाटनही हा चित्रपट करतो.

‘काला’चा कट्टर विरोधक असलेल्या हरीदादा अभ्यंकरांची शाळकरी नात आपल्या आजोबांना सांगते, ‘काला भला माणूस आहे, त्याला मारू नका.’ तेव्हा या सर्वसमावेशक जगण्याच्या प्रवाहातील अवघा आशयच ती इवलीशी पोर बोलत असते. आपल्याला हा चित्रपट तिच्या निखळ नजरेने पाहता येईल का, हा खरा प्रश्न आहे.

आणि तसं पाहता आलं तर आपल्याला कळेल की ‘काला’ कुणा जातिविशेषाविरुद्ध नाही, ना कुणा धर्माविरुद्ध! त्याचा विरोध आहे तो संस्कृतीच्या ठेकेदारांना, माझाच धर्म, माझीच संस्कृती श्रेष्ठ मानणाऱ्या वर्चस्ववादी मनोवृत्तीला ! आपण प्रत्येकानं परस्परांच्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे. विविध धर्म, पंथ, संस्कृती पोटात घेऊन जगणाऱ्या या देशात संस्कृतीची एकच एक बाजू प्रबळ होता कामा नये. आपल्या जमिनीवर ठाम राहताना हातात हात घेऊन चाललं पाहिजे. माणूसपण ठळक करणाऱ्या परस्परांच्या सांस्कृतिक संचिताचा आदर केला पाहिजे. या मातीतील विविधतेच्या रंगपंचमीत नित्य नव्यानं न्हाले पाहिजे.  मला जाणवलेले ‘काला’चे विधान आहे ते एवढेच आणि इतकेच! पण ते खरे करण्यासाठी आपल्याला आयुष्य झोकून द्यावे लागेल.
सौजन्य – लोकप्रभा