विराट कोहली, अनुष्का शर्माच्या लग्नाचीच चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत. पण, या सर्व चर्चांमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचा नवा लूक सुपरहिट ठरतोय. सुपरस्टार रजनीकांत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आगामी चित्रपटाचा नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काला या त्यांच्या आगामी चित्रपटाचा नवा लूक रजनीकांत यांचा जावई, चित्रपटाचा निर्माता आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता धनुषने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. काळा शर्ट, काळा चष्मा आणि दाढीमधील रजनीकांत यांचा लूक लक्षवेधी ठरत आहे.

पोस्टरमधील फोटोमध्ये रजनीकांत यांच्या चेहऱ्यावर अगदी गंभीर भाव पाहायला मिळत असून, एखाद्या गोष्टीकडे ते भेदक नजरेने पाहात असल्याची जाणीव होतेय. रजनीकांत यांच्या वाढदिवसाच्याच निमित्ताने हा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यामुळे अनेकांच्या मनात चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

वाचा : अबब! विरुष्काचे लग्न झालेल्या रिसॉर्टचे भाडे जाणून तुम्हीही व्हाल अवाक्

मुंबईतील एका डॉनच्या आयुष्यावर ‘काला’ या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. कबालीचे दिग्दर्शक पी. ए. रंजीत कालाचे दिग्दर्शन करत असून, ‘वंडरबार फिल्म्स’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण मुंबईतील धारावी येथेही करण्यात आले होते. तेव्हा आता कालाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणारे सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा नवे विक्रम प्रस्थापित करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त अभिनेत्री हुमा कुरेशी, साक्षी अग्रवाल, नाना पाटेकर आणि पंकज त्रिपाठी हे कलाकारही या ‘काला’मधून झळकणार आहेत.