सुहास जोशी

एखाद्या विशिष्ट वर्गाचे कथानक असेल  तर त्यांच्या रोजच्या व्यवहारातील भाषेचा वापर मालिका अथवा चित्रपटाच्या संवादासाठी करणे योग्यच असते. पण केवळ एवढीच जमेची बाजू असल्याप्रमाणे त्याआधारे लैंगिक कोटय़ा करत राहणे, त्याला पूरक दृश्य निर्मिती करणे आणि कसलेही धड कथासूत्र नसणे यामुळे असे कथानक हे निव्वळ पाणचट आणि बाळबोध या सदरात मोडते. झी ५ वरील ‘काळे धंदे‘ ही वेब सीरिज अशीच आहे.

एका चाळ सदृश्य वसाहतीत टिपिकल मध्यमवर्गीय घरात राहणारा तरुण विकी ऑनलाईन माध्यमातून एका तरुणीला भेटतो. समुद्रकिनारी फिरत असताना तारुण्यसुलभ वृत्तीमुळे एकमेकांच्या अतिजवळ आलेले ते दोघे चुंबनामध्ये गर्क होतात. त्याचवेळी विकीच्या वसाहतीतील बबनकाका त्यांना पाहतात. त्यातून विकीच्या घरात गदारोळ माजतो, त्याचा बदला घ्यायचा या भावनेने विकी आणि त्याचे दोन मित्र बबन काकाला एका जाळ्यात अडकवतात. बबन कनावजे या त्रिकुटाच्या मागण्या मान्य करतो, पण हा त्रास कायमचा मिटावा म्हणून तो एका गुंडाकडे जातो. तेथून या प्रकरणाला वेगळेच वळण लागते.

कथेला लागलेले हे वळणच नाहीतर आतापर्यंतची कथादेखील निव्वळ बाळबोध अशा मुद्यावर बेतली आहे. केवळ एका चित्रपटाइतका जीव असलेली अशी ही कथा आहे. पण सीरिज करण्यासाठी त्यात इतकं पाणी ओतलंय की आधीच बालिश असलेले प्रकरण आणखीन बालिश होते. अगदी चित्रपटाप्रमाणे यात गाणी देखील घुसडली आहेत.

वेब सीरिजमधील भाषेच्या वापरावर हल्ली बरीच चर्चा होताना दिसते. कसलेही नियंत्रण नसलेले माध्यम म्हणून तेथे वाटेल तसा भाषेचा वापर केला जातो. पण केवळ हीच संधी साधून ओढून ताणून त्याचा वापर करणे यातून काहीच साध्य होत नाही. आणि केवळ बोल्ड दृश्यं आहेत म्हणून एखादी कलाकृती खूप काही वेगळं सांगणारी ठरत नाही. ‘काळे धंदे’मध्ये यापलीकडे सिरीजकर्त्यांनी काही विचार केलेला दिसत नाही. मालिकेतील काही महिला पात्रे प्रेक्षकांच्या मनावर ठसवण्याच्या नादात अतिकर्कश्श होऊ न जातात.

समाज माध्यमावर फिरणाऱ्या पाणचट विनोदांचा वापर संवादासाठी करण्याचा प्रघात येथे देखील दिसतो. काल्पनिक कथा असल्यामुळे तर्काधारीत विश्लेषण प्रत्येक ठिकाणी असायलाच हवे असे म्हणता येत नाही. मात्र हे जरी मान्य केले तरी किमान सामान्य ज्ञान असायला हवेच. थोडीबहुत अक्कल वापरावी ही अपेक्षा निश्चितच गैर नाही. पण येथे सिरीजकर्त्यांनी सर्वच बाबी खुंटीला टांगून ठेवल्या आहेत.

या सर्व गदारोळात काही प्रमाणात व्यंगावर बोट ठेवण्याचे प्रसंग येतात, ते तुलनेने बरे वठले आहेत. पण अगदीच किरकोळ आहेत. सर्वसामान्य पापभिरू माणसाच्या आयुष्यातदेखील गुपितं असतात याची जाता जाता झलक दिसते. पण एकूणच काही एक थोर मांडणी असणारी कलाकृती सादर करावी यापेक्षा क्षणिक असे वरवरचे कथानक  या वेबसीरिजमधून समोर येते.

काळे धंदे

ऑनलाईन अ‍ॅप — झी ५

सीझन — पहिला