चित्रपटांना समाजाचा आरसा असे म्हटले जाते. या आरशात पाहून समाज प्रगल्भ होतो. परंतु अनेकदा या आरश्याचा विपरीत परिणाम देखील दिसून येतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. उत्तर प्रदेशमधील बिजनोर येथे राहाणाऱ्या एका तरुणाने ‘कबीर सींग’ या चित्रपटाच्या प्रभावाखाली येऊन तीन जणांचा खून केला आहे. खून केल्यानंतर तुरुंगात जाण्याच्या भीतीने त्याने आत्महत्या देखील केली. या तरुणाचे नाव अश्विनी कश्यप असे होते.

२३ हजार फॉलोअर्स असलेला अश्विनी सोशल मीडियावर टीक-टॉक व्हिलन म्हणून चर्चेत असायचा. गेले अनेक महिने तो एका मुलीचा पाठलाग करत होता. त्या मुलीला त्याने लग्नाची मागणी देखील घातली होती. परंतु त्या मुलीने अश्विनीला नकार दिला. त्यानंतर लवकरच त्या मुलीचे लग्न होणार असल्याची माहिती त्याला मिळाली. त्या मुलीने इतर कोणाशी लग्न करुन नये म्हणून त्या मुलीचा त्याने खून केला. पहिल्या खून केल्यानंतर पुढच्या काही दिवसात त्याने आणखी दोन जणांची गोळ्या घालून हत्या केली. त्या दोघांनी त्याची सर्वांसमोर खिल्ली उडवली होती, म्हणून त्याने त्या दोन तरुणांचा खून केला.

मुलीचा खून करण्यापूर्वी आश्विनीने एक टीक-टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत त्याने अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘कबीर सींग’ या चित्रपटातील “जो मेरा हो नहीं सकता, उसे किसी और का हो जाने का मौका नहीं दूंगा.” हा डायलॉग म्हटला होता. या व्हिडीओमुळे त्याने ‘कबीर सींग’ या चित्रपटाच्या प्रभावाखाली येऊन खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली.

खून केल्यानंतर अश्विनी फरार झाला. पोलिसांनी त्याच्यावर तब्बल ५० हजार रुपयांचे बक्षिस देखील जाहीर केले होते. वृत्तमाध्यमांतूही अश्विनी फरार झाल्याच्या बातम्या झळकू लागल्या होत्या. अखेर पोलीस पकडून आपल्याला तुरुंगात टाकतील या भितीने त्याने स्वत:लाच गोळी मारुन आत्महत्या केली.