चित्रपटांमधील भूमिकांसाठी अनेकदा कलाकारांना वजन कमी करावे लागते किंवा वाढवावे लागते. भूमिकेच्या गरजेनुसार कलाकारांना त्यांच्या शरीरयष्टीत बदल करावा लागतो. आगामी ‘कबीर सिंग’ चित्रपटातील भूमिकेसाठी सुद्धा शाहिदने खूप मेहनत घेतली आहे. शाहिदने आधी ८ किलो वजन कमावले आणि मग नंतर पुन्हा १४ किलो वजन कमी केले. फिटनेसचं वेड असणाऱ्या या अभिनेत्यासाठी ही गोष्ट नक्कीच कठीण होती. पण, बॉलिवूडमधील कलाकार भूमिकेला न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतात. भूमिकेची गरज ओळखून ती भूमिका योग्यप्रकारे निभावण्यासाठी ते सखोल अभ्यास करतात आणि अभिनेता शाहिद कपूरदेखील अशाच अभिनेत्यांपैकी एक आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने हा खुलासा केला. आता चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर शाहिदने आता त्याचे वर्कआऊट पुन्हा सुरु केले आहे. ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला की, “वैयक्तिक आयुष्यापेक्षा भूमिकेची गरज जास्त महत्त्वाची आहे. कबीर सिंगची भूमिका एका भावनिक बदलातून जाते. प्रेमभंगामुळे तो ड्रग व दारूच्या आहारी गेला आहे. आपण कसे दिसतो याची त्याला अजिबात पर्वा नाहीये. अभिनेते कायमच चांगल्या लूकमध्ये चित्रपटात दिसत असतात. पण, मला मात्र इथे वेगळा लूक साकारायचा होता.”

८ किलो वजन वाढवल्यानंतर शाहिदला १४ किलो वजन कमी करायचे होते. शाहिदला कॉलेजमधील मुलाची भूमिका करायची होती. त्यासाठी त्याने तरुण दिसणे आवश्यक होते. आताच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांसारखे शाहिदला दिसायचे होते. शाहिदने सांगितले की, “तुम्ही काय खाता हे तुमच्या डाएट प्लॅनवर असते. मी दारू पित नाही आणि मी शाकाहारी आहे. वजन कमी करण्यासाठी मी कमी कॅलरी असलेले पदार्थ खायचो.”

‘कबीर सिंग’ हा चित्रपट सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक आहे. रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगा करत असून हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे.