‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला ‘कबीर सिंग’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटामध्ये शाहिद कपूर व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला आहे. तरदेखील या चित्रपटावरुन सुरु झालेला वाद शमलेला नाही. या चित्रपटामध्ये शाहिदने वठविलेल्या भूमिकेतून महिला वर्गाचा अनादर होत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. ही भूमिका शाहिदने केल्यामुळे त्याच्यावरही अनेक जण टीका करत आहेत. सोबतच त्याने ही भूमिका का स्वीकारली? असा प्रश्नही त्याला विचारण्यात येत आहे. विशेष म्हणजे सर्व स्तरांमधून उमटत असलेल्या या प्रतिक्रियांमध्ये शाहिदच्या आईने निलिमा अजीम यांनीदेखील त्यांचं मत मांडलं आहे. सोबतच त्या शाहिदच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याचं दिसून येत आहे.

”कबीर सिंग’ या चित्रपटामध्ये शाहिदने वठविलेल्या भूमिकेचं निलिमा अजीम यांनी कौतुक केलं असून अशा परफॉर्मन्ससाठी हॉलिवूडमध्ये कलाकारांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. कलाकारांना विविध भूमिका साकारण्याचं स्वातंत्र असतं. त्यामुळे नैतिकदृष्ट्या चुकीच्या असलेल्या व्यक्तीची भूमिका वठविण्याचंही स्वातंत्र कलाकारांना आहे. ही भूमिका साकारण्यासाठी प्रत्येक कलाकार त्याचं कसबपणाला लावत असतो”, असं निलिमा म्हणाल्या आहेत.

पुढे त्या म्हणाल्या, ”या भूमिकेविषयी अनेकांचे गैरसमज आहेत ते दूर केले पाहिजेत. उद्या जर एखाद्या कलाकाराने ‘सायको किलर’ची भूमिका केली आणि ती प्रेक्षकांनी पाहिली तर लगेच तेही सायको किलर होतील का ? जर असं असे तर कलाकारांनी नकारात्मक भूमिका करणं बंद करावं का ? कबीर सिंग हा चित्रपट कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्षात कबीर सिंग व्हा असं प्रोत्साहन देत नाही. उलट आपल्याला कबीर सिंग व्हायचं नाहीये, अशी शिकवण या चित्रपटातून प्रत्येकाने घ्या”.

दरम्यान, गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ पाच दिवसांमध्ये १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे या कमाईमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.