तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंती उतरला. दरम्यान चित्रपटाची बॉक्स ऑफीसवरील कमाई कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. आता ‘कबीर सिंग’ लवकरच २०० कोटींची कमाई करणार असल्याचे म्हटले जात आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ‘कबीर सिंग’ चित्रपटाची कमाई ट्विटद्वारे सांगितली आहे. चित्रपट लवकरच २०० कोटींचा पल्ला करणार असल्याची शक्यतादेखील तरण आदर्श यांनी वर्तवली आहे. तसेच चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात १९०.६४ कोटींचा गल्ला कमावल्याची माहिती दिली आहे.

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २०.२१ कोटी रुपयांची कमाई केली असून शाहिदच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंती उतरल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई सुरुच आहे.

अर्जुन रेड्डीने बॉक्स ऑफीसवर जितकी कमाई केली होती, त्याहून अधिक कमाई ‘कबीर सिंग’ने अवघ्या तीन दिवसांत केली होती. शाहिद कपूर, कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे. २०१९ या वर्षातील प्रदर्शनाच्या दुसऱ्या शुक्रवारी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट आहे. याबाबतीत शाहिदने सलमान खान अक्षय कुमार या दिग्गजांनाही मागे टाकले आहे.

या चित्रपटामध्ये शाहिदने एका तापट स्वभावाच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची भूमिका साकारली आहे. ‘अर्जुन रेड्डी’चे दिग्दर्शक संदीप वांगा यांनीच कबीर सिंगचं दिग्दर्शन केले आहे.

प्रेक्षकांनी जरी या चित्रपटाला डोक्यावर उचलून घेतले असले तरी काहींनी यामधील शाहिदच्या भूमिकेवर टीका केली आहे. सतत कोणाच्या तरी अंगावर ओरडणे, एका ठरावीक चौकटीतून समोरच्याकडे पाहणारी, त्याच्याकडून तशीच अपेक्षा ठेवणारी व्यक्तिरेखा प्रत्यक्षात नाहीच असे म्हणता येत नाही. मात्र त्याच्या वागण्याचे समर्थनही करता येत नाही, असे अनेकांचे मत आहे. दुसरीकडे काहींनी शाहिदच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. त्याच्या करिअरमधील ही सर्वोत्तम भूमिका असल्याचे काहींचे म्हणणे आहे.