उत्तम विनोदवीर, संवाद लेखक, दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवलेले अभिनेते कादर खान यांचा बॉलिवूडमधला प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेले कादर खान यांचं खासगी आयुष्यदेखील चित्रपटाइतकंच नाट्यमय होतं. उत्तम अभिनयासाठी त्यांना एका वृद्धानं १०० रुपयाची नोट बक्षीस म्हणून दिली होती. बालपणी मिळालेलं हे बक्षीस त्यानं कित्येक वर्ष जपून ठेवलं होतं, मात्र परिस्थितीमुळे त्यांना ही नोट खर्च करावी लागली होती.

कादर खान ८ -९ वर्षांचे असतील तेव्हा त्यांचं नाटक पाहायला एक ज्येष्ठ व्यक्ती आली होती. कादर खान यांच्या अभिनयकौशल्यानं प्रभावित झालेल्या या ज्येष्ठ व्यक्तींनं त्यांना १०० रुपयाची नोट बक्षीस म्हणून दिली होती. ही नोट तुझ्या सर्वोत्तम अभिनयाची पोचपावती असं सांगत त्या व्यक्तीनं भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम भेट म्हणून मिळाल्यानंतर कादर खानही खूप खूश होते. ही नोट त्यांनी कित्येक वर्षे त्यांनी जपून ठेवली होती. मात्र घरची परिस्थिती हलाखीची असताना बक्षीस म्हणून मिळालेली हीच नोट त्यांच्या कामी आली होती. घरात कठीण परिस्थिती असताना त्यांनी किराणा माल भरण्यासाठी हिच १०० रुपयांची नोट खर्च केली होती.

अशरफ खान यांनी मला पहिली संधी दिली दिली. त्यांच्यामुळेच गरीब कुटुंबात राहणारा मी राजकुमारची भूमिका करू लागलो असंही ते एका मुलाखतीत म्हणाले होते. अशरफ खान यांनी कादर खान यांना स्मशानभूमीत उभं राहून अभिनय करताना पाहिलं होतं.