आसाममध्ये आलेल्या पुरामध्ये ९० हून अधिक जणांना प्राण गमावाव लागला आहे. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामधील अनेक प्राण्यांनाही या पूराचा फटका बसला असून शेकडो प्राण्यांचा मृत्यू झाला. ही पुरपरिस्थिती दूर्देवी असल्याचे मत अभिनेता अक्षय कुमार याने व्यक्त केले आहे. इतकेच नाही त्याने आसाममधील पूरग्रस्तांना मदत म्हणून आसामच्या मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये एक कोटी रुपये दिले आहेत. तसेच त्याने काझीरंगा राष्ट्रीय उद्यानालाही एक कोटींची मदत केली आहे. विशेष म्हणजे “देवाच्या कृपेने माझ्याकडे भरपूर पैसा असून मला एवढा पैसा कुठे घेऊन जायचाय?”, असा सवाल त्याने ही देणगी दिल्यानंतर उपस्थित केला.

अक्षय कुमार केलेल्या मदतीबद्दल कधी बोलून दाखवत नाही मात्र यावेळी त्याने पैसे दिल्यानंतर त्याला समोरुन आसामच्या मुख्यमंत्र्यांचा फोन आला. याबद्दल बोलताना तो म्हणतो, “मी जेव्हा पैसे दिले तेव्हा मला जेवढा आनंद झाला नाही तेवढा मला आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या (सर्बानंद सोनोवाल) कॉल आल्यावर झाला. तुम्ही मदत केल्यानंतर इतर अनेक लोकांनीही मदत केली आहे. ते ऐकून मला आनंद झाला. माझा देश खरच छान असल्याचे मला वाटले. एखादी अडचण असेल आणि तुम्ही त्यासाठी पुढाकार घेतला की इतरही लोक तुमच्यासोबत येतात. मी जेव्हा ‘भारत के वीर’ अॅप्लिकेशनसाठी काम करत होतो तेव्हा असंख्य लोकांनी जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली. भारत हा बडे दिलवालो का देश आहे. आपल्याला फक्त गरज असते ती कोणीतरी सुरुवात करुन द्यायाची.”

अक्षय कुमार आणि कपिल शर्माच्या कार्यक्रमांनी त्यांच्या एका दिवसाच्या शोची कमाई आसाममधील पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली. याबद्दल आसाममधील गायिका बोर्नाली देऊरी हिने या दोघांचेही आभार मानले. “एक आई आपल्या बाळाला खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून जातानाचा फोटो पाहिल्यावर मी अस्वस्थ झालो. तिच्या चेहऱ्यावर दु:ख किंवा थकवा जाणवत नव्हता. पण तिचा हा असा भावनाशून्य चेहरा मला धोक्याची चाहूल असल्यासारखं वाटलं. एवढ्या पूरामध्येही तिला वाईट वाटू नये म्हणजे ती कोणत्या परिस्थितीमधून गेली असेल याचा विचार करता येणं कठीण आहे. मी जेव्हा असे फोटो पाहतो तेव्हा मला वाटतं की हे माझ्या पत्नी किंवा मुलीबरोबरही घडू शकते. अशा फोटोंचा खूप जास्त त्रास होतो. म्हणून मी अशा ठिकाणी माझ्यापरीने मदत करतो.”

पुरामुळे काझीरंगा अभयारण्यातील २२५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. ‘काझीरंगा’मधील ३० टक्के परिसर पुराच्या पाण्याखाली आहे. “पूराच्या पाण्यात तरगंणाऱ्या, अडकून पडलेल्या काही गेंड्यांचे फोटोही मी पाहिले. अशा संकटाच्या वेळी आपण सगळे किती पैसे मदत म्हणून देतो याचा विचार न करता एकत्र येऊन मदत करणे गरजेचे आहे. सर्वात आधी माणुसकी असते हे लक्षात घ्यायला हवं. देवाच्या कृपेने मला खूप पैसा मिळतोय. त्यामुळे मी अधिक विचार न करता अशा प्रसंगी शक्य तेवढी आर्थिक मदत करतो. कुठे घेऊन जायचाय मला एवढा पैसा?” असा सवाल त्याने उपस्थित करत दानशूरपणामागील संकल्पना स्पष्ट केली.

सध्या अक्षयची प्रमुख भूमिका असणाऱ्या मिशन मंगलने भारतामध्ये १०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. तसेच तो आता त्याच्या आगामी सिनेमांच्या कामामध्ये व्यस्त आहे. हाऊसफूल ४, गुड न्यूज, सुर्यवंशी, लक्ष्मी बॉम्ब, बच्चन पांडे आणि पृथ्वीराज चौहान या सिनेमांमधून अक्षय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येणार आहे.