सिक्वलपटांमध्ये तुलनेचा भाग जास्त आणि साहजिक असतो त्यामुळे ‘कहानी २’चा विचार करतानाही विद्या बालन आणि दिग्दर्शक सुजॉय घोष जोडीच्या पहिल्या चित्रपटाची हटकून आठवण येते. या चित्रपटात पहिल्याचा काहीच संबंध नाही. पूर्णत: वेगळी अशी कहाणी आहे. धक्कातंत्र हे दिग्दर्शक म्हणून सुजॉयचे शस्त्र आहे जे त्याने प्रभावीपणे ‘कहानी’मध्ये वापरले होते. इथे त्याच शस्त्राचा वापर करताना थोडीशी वेगळी मांडणी त्याने केली आहे. पण अर्थात दुर्गा रानी सिंगची कथा सांगताना एका वळणावर दिग्दर्शकाचे हे धक्कातंत्र उघडे पडते. प्रेक्षकांना पूर्ण कथा कळून चुकते आणि त्यामुळेच ‘कहानी २’च्या रहस्याचा परिणाम फिका पडतो. कोलकाता हे सुजॉयचे शहर आहे त्यामुळे ‘कहानी २’मध्येही या शहराचा त्याने कथेसाठी पूरेपूर वापर करून घेतला आहे. किंबहुना पहिल्या चित्रपटापेक्षा या चित्रपटात काकणभर जास्तच कोलकाता शहरातलं दैनंदिन जीवनही प्रेक्षकांना अनुभवायला मिळतं. या वेळी आपल्या नायिकेचं नाव दुर्गा रानी सिंग असलं तरी चित्रपटाच्या पूर्वार्धात ती आपल्याला बिद्या (विद्या) सिन्हा म्हणूनच भेटते. बिद्या आणि तिची अपंग मुलगी मिनी यांची ही कथा आहे. मिनीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बिद्याचं एकच ध्येय आहे ते म्हणजे अमेरिकेत मोठय़ा रुग्णालयात जाऊन मिनीवर उपचार करायचे. मिनीला सांभाळणारी नर्स, तिच्या शेजारचे काका आणि ऑफिस यात बिद्या रमली आहे. पण एके दिवशी अचानक मिनी घरातून गायब होते, तिच्या पाठी पळणाऱ्या बिद्याचा अपघात होतो आणि कथेत इंद्रजीत सिंग (अर्जुन रामपाल) या पोलीस इन्स्पेक्टरचा प्रवेश होता. यापाठोपाठ घडणाऱ्या घटनांमधून बिद्याचा भूतकाळ, मिनीचं अपंगत्व अशा एकेक गुंतलेल्या गोष्टी बाहेर आणत दिग्दर्शक कथा पुढे नेतो.

कॅलिपाँग ते चंदननगर व्हाया कोलकाता  शहर असा ‘कहानी २’चा मोठा परीघ आहे. या वेळी केवळ रहस्यकथा न ठेवता त्याला लहान मुलींच्या शरीराशी प्रेमाच्या नावाखाली खेळणाऱ्या नात्यातल्याच पुरुषी अत्याचारांची जोड दिग्दर्शकाने दिली आहे. चित्रपटात बिद्या म्हणजेच दुर्गा रानी सिंग स्वत: लहानपणी अशा अत्याचारांची बळी ठरली आहे. त्याचा परिणाम तिच्या संपूर्ण आयुष्यावर झाला आहे. मिनीच्या बाबतीत ते होऊ नये म्हणून केवळ स्त्रीच्या, माणुसकीच्या नात्याने झगडणारी नायिका दुर्गा ही या चित्रपटाची सशक्त बाजू आहे. आणि विद्या बालनने तिच्या नेहमीच्या सहजाभिनयाने बिद्या ते दुर्गा हा प्रवास जिवंत केला आहे. अर्जुन रामपालच्या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने आपल्या देशाच्या कुठल्याही भागात दिसणारी भ्रष्टाचारी, उदासीन पोलीस व्यवस्थेचं चित्रणही ‘कहानी २’मध्ये दिसतं. अर्जुनची व्यक्तिरेखा त्याच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे संपूर्ण चित्रपटभर खेळवत ठेवलेल्या रहस्यामागे असलेली अर्जुनची हलकीफुलकी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना थोडासा मनोरंजनाचा डोसही पुरवते. जुगल हंसराज चित्रपटात अगदी छोटय़ा भूमिकेत आहे. जितक्या वेगाने पूर्वार्धात आणि त्यानंतरचा काही वेळ कथा धावत राहते तिला शेवटाकडे नेताना मात्र दिग्दर्शकाने एकदमच उडय़ा घेत चित्रपट संपवायचा प्रयत्न केला आहे. अर्जुनच्या माध्यमातून खेळवलेलं रहस्यही प्रेक्षकांच्या लक्षात आल्यामुळे मग माहिती असलेला शेवट पाहण्याशिवाय हातात काही राहत नाही. ‘कहानी २’मध्ये धक्कातंत्राच्या बाबतीत दिग्दर्शक सुजॉयचं कौशल्य कमी पडलं असलं तरी एकूणच त्याची चित्रीकरणाची हातोटीच वेगळी असल्याने त्याच्या मनात दडलेल्या कोलकाताची ही दुसरी ‘कहानी’ एकदा तरी पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही इतकी चांगली नक्कीच आहे.

कहानी २

दिग्दर्शक –  सुजॉय घोष

कलाकार विद्या बालन, अर्जुन रामपाल, जुगल हंसराज, नायेशा सिंग, तोतारॉय चौधरी, अंबा सन्याल.