९० च्या दशकातील आघाडी अभिनेत्री म्हणून आजही काजोलचं नाव घेतलं जातं. कलाविश्वाचं झगमगत तारांगण आजूबाजुला असूनदेखील काजोलने तिचा साधेपणा जपला. कालानुरुप काजोलमध्ये बदल झाले. तिचा फॅशनसेन्स बदलला परंतु, तिच्या स्वभावातील साधेपणा आजही कायम आहे. त्यामुळेच आजही तिच्या या साधेपणाचे असंख्य चाहते आहेत. आज काजोलचा वाढदिवस अभिनयाच्या जोरावर अनेकांना आपल्या प्रेमात पाडणारी काजोल खऱ्या आयुष्यात मात्र अभिनेता अजय देवगणच्या प्रेमात पडली. विशेष म्हणजे त्यांची लव्हस्टोरीदेखील तितकीच रंजक असल्याचं पाहायला मिळतं. एका मुलाखतीत काजोलने तिची लव्हस्टोरी सांगितली आहे.

बॉलिवूडमधील लव्हेबल कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जोडीची पहिली भेट १९९५ साली हलचल या चित्रपटाच्या सेटवर झाली. “चित्रपटाच्या सेटवर मी शूटसाठी तयार होऊन बसले होते. परंतु, माझा सहकलाकार कोण असेल हेच मला ठाऊक नव्हतं. त्यामुळे मी सेटवर प्रत्येकाला माझ्या सहकलाकाराचं नाव विचारत होतं. त्याचवेळी एकाने मला कोपऱ्यात बसलेल्या अजयकडे खूण करत हा तुझा सहकलाकार आहे असं सांगितलं. त्यानंतर काम करताना हळूहळू आमची ओळख झाली आणि आमच्यात छान मैत्रीचं नातं निर्माण झालं”, असं काजोल म्हणाली.

पुढे ती म्हणते, “हलचल वेळी अजय एका मुलीला डेट करत होता. तर माझ्या आयुष्यातही एक खास व्यक्ती होता. परंतु, आमच्या नात्यात चढउतार येत असल्यामुळे मी बऱ्याच वेळा त्याची तक्रार अजयकडे करायचे. याच काळात माझा आणि माझ्या प्रियकराचा ब्रेकअप झाला. परंतु, या प्रसंगात अजयने मला खूप मदत केली. कायम माझ्यासोबत होता. खरं तर मी किंवा अजय आम्ही दोघांनीही कधीच एकमेकांना प्रपोज केलं नाही किंवा आमचं प्रेम व्यक्त केलं नाही. पण आमच्यात मैत्रीपलिकडे एक नातं होतं याची जाणीव आम्हाला होती. त्यामुळेच एकमेकांप्रती असलेल्या ओढ आणि प्रेमामुळे आम्ही जवळ आलो”.

दरम्यान, अजय आणि काजोलने जवळपास ४ वर्ष एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.परंतु, त्यांचं लग्नदेखील वाटतं तितक्या सहजपणे झालं नाही. अजयच्या घरातून लग्नासाठी होकार होता. मात्र, काजोलच्या वडिलांनी तिच्याशी काही काळ बोलणं बंद केलं होतं. कजोलने करिअरवर लक्ष केंद्रीत करावं असं तिच्या वडिलांना वाटत होते. परंतु, हळूहळू काजोलच्या वडिलांच्या मनातील अढी दूर झाली आणि ते अजय- काजोलच्या लग्नासाठी तयार झाले. त्यानंतर१९९९ मध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नगाठ बांधली.