‘शिवाय’ या चित्रपटाच्या निमित्ताने गेला काही काळ व्यग्र असलेली अभिनेत्री काजोल लवकरच पुन्हा एकदा एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये काजोल ‘सिंगल मदर’च्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसठी सध्या काजोल फारच उत्सुक आहे. पुढच्या वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून आनंद गांधी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा अभिनेता अजय देवगण सांभाळणार आहे.
या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे काजोलने स्पष्ट केले आहे. मी या चित्रपटामध्ये ‘सिंगल मदर’च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची पटकथा आणि भूमिका आवडल्याचे म्हणत काजोलने तिची उत्सुकता व्यक्त केली.
काजोलच्या मते चांगले दिसण्यासाठी कलाकारांवर चाहते आणि प्रसारमाध्यमांमुळे एक प्रकारचा तणाव असतो. आधीच्या काळात कलाकारांवर अशा प्रकारचा तणाव नसायचा असे म्हणत काजोलने अनेकांचेच लक्ष वेधले आहे. सकाळ असो वा दुपार आम्ही कलाकार ज्यावेळी घराबाहेर पडतो त्यावेळी नेहमीच आम्हाला चांगले दिसावे लागते, असेही काजोल म्हणाली. ‘मी या सर्व गोष्टींकडे लक्ष देत नाही. मी आहे त्याच अवस्थेत चांगली आहे’, असे काजोलने स्पष्ट केले.
दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद गांधी यांच्या दिग्दर्शनामध्ये बनणाऱ्या सिनेमात काजोल मुख्य भूमिकेत दिसेल. गांधी यांनी याआधी शिप ऑफ थिसीस यांसारखा सिनेमा बनवला होता. त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव अजून तरी निश्चित झाले नसले तरी गांधी यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटकांपैकी एक असेल. गांधी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून ते स्वतः काजोलसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे. हा सिनेमा त्यांनी फार आधी लिहिलेल्या एका नाटकावर आधारीत आहे. या सिनेमाची निर्मिती अजय देवगण करणार असून आतापर्यंत या सिनेमाच्या शूटिंगची आणि प्रदर्शनाची तारीख याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. पण ‘शिवाय’ सिनेमाच्या प्रमोशनवेळी एका मुलाखतीत अजयने काजोलला घेऊन नवा सिनेमा बनवण्याच्या विचारात तो असल्याचे म्हणला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2016 3:12 pm