सातत्याने निवडक भूमिकांमधून समोर येणारी काजोल पुन्हा एकदा ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या ओम राऊत दिग्दर्शित चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. काजोलच्या कारकीर्दीतील ही पहिलीच ऐतिहासिक भूमिका आहे, शिवाय हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांतून प्रेक्षकांसमोर येतो आहे. शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्याची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात काजोलने तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीची भूमिका केली आहे. या आगळ्यावेगळ्या भूमिकेबद्दल बोलताना पुढे जाऊन आई तनुजा किंवा आजी शोभना समर्थ यांच्यावरील चरित्रपटांत काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली.

काजोलला आई तनुजा किंवा आजी शोभना समर्थ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात काम करायची इच्छा आहे. त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा असल्याने त्यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या माध्यमातून मांडायला आवडेल, असं ती म्हणते.  ‘यू मी और हम’ या चित्रपटात काजोल आणि अजयने एकत्र काम केले होते, त्यानंतर १० वर्षांनी ते दोघं एकत्र काम करीत आहेत. नवऱ्यासोबत काम करताना आजही तेवढीच मजा येत असल्याचे ती आवर्जून नमूद करते.

‘तान्हाजी’ या चित्रपटाची बोलणी सुरू असताना अजयने मला सावित्रीच्या भूमिकेविषयी विचारले होते. तेव्हा खरे तर सावित्रीची भूमिका पडद्यावर साकारेन का, याविषयी मी साशंक होते. परंतु अजयने मनधरणी केल्यावर मी ही भूमिका करण्याचे ठरवले, असे तिने सांगितले. सावित्री मालुसरेंची भूमिका करताना मला इतिहास अभ्यासण्याची संधी मिळाली. मराठीत तान्हाजी मालुसरेंबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही. सावित्रींची तर अगदीच कमी माहिती आहे. मी लहान असताना शाळेत शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल जेवढं ऐकलं आणि वाचलं होतं, त्याचा उपयोग मला चित्रपटात ही भूमिका साकारताना झाला, असे सांगतानाचऐतिहासिक चित्रपटात भूमिका करायला मिळणे ही कलाकारासाठी अभिमानाची गोष्ट असते, असेही तिने सांगितले.

या चित्रपटासाठी अभ्यास करताना दिग्दर्शक ओम राऊतची मदत झाल्याचे तिने सांगितले. इतिहासातील काही संदर्भामध्ये तान्हाजी मालुसरेंच्या गोष्टींचा नावापुरताच उल्लेख करण्यात आला आहे. त्याचे बारकाईने वर्णन नाही. त्यामुळे चित्रपट करताना काही संशोधक तसेच पुस्तकांची मदत घेण्यात आली. तसेच काही दृश्ये कल्पनाविस्ताराने पडद्यावर मांडलेली आहेत, असेही काजोलने सांगितले. तान्हाजींचे आयुष्य दोन तासांच्या चित्रपटात दाखवायचे असल्याने काही दृश्यांचा कल्पनाविस्तार करणे भागच होते, असेही तिने स्पष्ट केले.

सावित्रीच्या मुलाचे लग्न ठरलेले असते, परंतु कोंढाणा जिंकल्याशिवाय मुलाचे लग्न करणार नाही या तान्हाजींच्या निर्णयाशी ती ठामपणे उभे राहते. एकीकडे नवऱ्याचा मान राखायचा आणि दुसरीकडे मुलाचे लग्न या दोन्हींच्या कात्रीत अडकलेल्या अशा सावित्रीची ही भूमिका आहे. तरीही ती ठामपणे नवऱ्याच्या पाठीशी उभी राहते. हा तिचा गुण मला जास्त आवडतो. अशा अनेक सावित्री आज आपल्या आजूबाजूला आढळतात. नवऱ्याच्या सुखदु:खात खंबीरपणे तोंड देणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, असे सांगतानाच वास्तव आयुष्यातही अजयच्या प्रत्येक निर्णयात आपला तेवढाच सक्रिय सहभाग असतो, असे ती म्हणते. सैफ अली खानने या चित्रपटात उदयभान राठोडची भूमिका साकारली आहे. काजोलने सैफबरोबरही आधी चित्रपट केले आहेत, मात्र या चित्रपटात त्याच्याबरोबर आपले एकही दृश्य नाही, असे ती म्हणते.

सावित्रीची भूमिका साकारताना काजोल मराठमोळ्या पोशाखात दिसली आहे. मी पहिल्यांदाच पडद्यावर नऊवारी साडी नेसली आहे. नऊवारी साडी नेसताना आई, आजी आणि मावशीला पाहिले होते. त्यामुळे नऊवारी साडी मला नवीन नाही असेही ती म्हणते. साडेतीनशे वर्षांपूर्वी कपडय़ाची पद्धत अनोखी होती. नऊवारी साडी नेसण्यासाठी आशाताई या ७० वर्षांच्या वयोवृद्ध आजींना सेटवर बोलावण्यात आले होते, अशी माहिती तिने दिली. नऊवारी साडी, बुगडी, हिगव्या बांगडय़ा, कोल्हापुरी साज असा साजशृंगार करण्यास दोन तास लागत होते. ही प्रक्रिया वेळखाऊ असली तरीही आनंददायी होती, असेही तिने सांगितले.

‘यू मी और हम’ चित्रपटानंतर तब्बल ११ वर्षांनंतर चित्रपटात अजयच्या पत्नीची भूमिका साकारते आहे. बॉलीवूडमध्ये काजोल आणि अजयची जोडगोळी सर्वात यशस्वी मानली जाते. १९९४ मध्ये ‘गुंडाराज’ चित्रपटात अजय देवगणसोबत काम करताना त्यांची प्रेमकथा आकारास येऊ लागली. नंतर १९९९ मध्ये काजोल आणि अजय विवाहबद्ध झाले. ‘नवऱ्यासोबतच काम करताना एक वेगळी मजा येते. चित्रपटाच्या सेटवर आम्ही व्यावसायिक पद्धतीने काम करतो. कलाकाराने आपले खासगी आणि व्यावसायिक जीवन वेगळे ठेवावे. पती-पत्नीमधील नाते हे विश्वासाचे असले पाहिजे. झाडाला जसे खतपाणी देतात त्याप्रमाणे नात्याला विश्वास, वेळोवेळी संवाद, थोडीशी मेहनत, तर कधी तडजोड करावी लागते. माझ्या आणि अजयच्या सुखी संसाराचे हेच रहस्य आहे, असे मत काजोलने या वेळी व्यक्त केले.

लग्न आणि मुलं झाल्यावर काही गोष्टींना प्राधान्य द्यावे लागले. अजय आणि काजोलने न्यासा आणि मुलगा युगला जबाबदारीने वाढवले आहे. गेल्या वर्षांत अजयचे वडील आणि ज्येष्ठ स्टण्ट दिग्दर्शक वीरू देवगण यांचे निधन झाल्यानंतर लगेचच घराबाहेर पडलेल्या न्यासाला समाजमाध्यमांवर ट्रोल करण्यात आले होते. त्याबद्दल बोलताना समाजमाध्यमांवर कलाकारांची होणारी ट्रोलिंग नित्याची बाब आहे. समाजमाध्यमांवर चालणाऱ्या ट्रोलिंगचा जास्त विचार करू नकोस असा सल्ला आपण आपल्या दोन्ही मुलांना दिला असल्याचे काजोलने सांगितले.

सध्या ‘मर्दानी’, ‘सांड की आँख’, ‘खानदानी शफाखाना’, ‘मनकर्णिका’ या चित्रपटांमुळे महिलाप्रधान चित्रपटांची लाट उसळली आहे. काजोलला हा बदल सकारात्मक वाटतो. ‘पूर्वी नायकाच्या नावावर चित्रपट चालायचे, यशस्वी व्हायचे; परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. आता नायिकांच्या जोरावरही सिनेमा चित्रपटगृहांत गर्दी खेचतो. नायिकाप्रधान चित्रपटाची कथा तगडी असायला पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे. कारण भूमिकेचा गाभा कळल्यास ती पडद्यावर सहजपणे निभावता येते. चांगल्या कथेसाठी विचारणा केल्यास आपणही अशा नायिकाप्रधान चित्रपटात नक्की काम करू, असेही तिने सांगितले.

‘प्रेक्षकांच्या कक्षा रुंदावल्या’

गेल्या काही वर्षांत दर्जेदार चित्रपट तयार होत आहेत. तंत्रज्ञानातील बदलांबरोबरच प्रेक्षकही आशयाच्या बाबतीत अधिक सजग झालेला असून त्याच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म आणि चित्रपट महोत्सव यामुळे जागतिक दर्जाचे चित्रपट प्रेक्षक पाहात आहे. यामुळे आपणही तंत्रज्ञान, आशय, संगीताच्या बाबतीत तोडीस तोड चित्रपट दिले पाहिजेत. आपल्याकडे चांगलेच चित्रपट होतात; परंतु अजून जोमाने व्हायला पाहिजेत. जगभरात कोरियन, जपानी, इराणी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांत विविध प्रयोग करण्यात आले आहेत. असे प्रयोग भारतातही मोठय़ा प्रमाणावर होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही काजोलने व्यक्त केली.