कधी कधी आपण उत्साहाने काही तरी बघायला जातो आणि तिथे गेल्यावर अनेक कारणांनी आपला विरस होतो, तर कधी कधी अनपेक्षितपणे आपल्याला सुखद धक्का बसतो, असेच काहीसे या वर्षीच्या ‘काळा घोडा फेस्टिव्हल’बद्दल म्हणावे लागेल. मांडणशिल्पांची दिवसेंदिवस कमी कमी होत जाणारी संख्या, या कला महोत्सवाला भेट देणाऱ्यांचा फुगत चाललेला आकडा आणि त्याच प्रमाणात तिथे वाढत जाणारी हुल्लडबाजी, वाढत जाणारी स्टॉल्सची संख्या, तर अनपेक्षितपणे छत्रपती वस्तुसंग्रहालयाच्या आवारात असणारी लहान मुलांची अत्यंत कल्पक आणि सुखावणारी मांडणशिल्पं असेच वर्णन ‘काळा घोडा कला महोत्सवाचे करावे लागेल.

काळा घोडा महोत्सवातील दृश्यकलेसाठी ‘द स्पीड ऑफ लाइट’ (प्रकाशाचा वेग) ही संकल्पना होती. त्या अनुषंगाने असलेल्या मांडणशिल्पांमध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा दैनंदिन जीवनमूल्यांशी संबंध लावून कलाकारांनी आपापले सिद्धांत सादर केले होते. ‘डान्स ऑफ पास्ट अ‍ॅन्ड फ्युचर’, ‘टाइम पॉज’, ‘रॉकिंग हॉर्स’, ‘टॉपिअरी ऑफ काळा घोडा’, ‘ढाई चाल की गती’, ‘द फ्लाइंग हॉर्स’, ‘द क्युब ऑफ होप’ आणि इतर काही मांडणशिल्पांचा यात समावेश होता.

या वर्षीच्या महोत्सवामधील मांडणशिल्पांमध्ये घोडे अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. वेग, आशा, उड्डाण, कल्पना यासाठी प्रतीकात्मक म्हणून त्यांचा वापर दिसून येतो. त्याचप्रमाणे मांडणशिल्पांसाठी वापरण्यात येणाऱ्या माध्यमांमध्येही या वेळी वेगळेपण आहे. मागील काही वर्षांमध्ये प्लॅस्टिक बाटल्या, फायबर यांचा वापर मोठय़ा प्रमाणात केलेला असायचा. या वेळी लोकर, दोरा (कदाचित वेलस्पन सहयोगी प्रायोजक असल्यानेही असेल), रंगीत धागे, लाकूड, कोळसा यांचा वापर मोठय़ा प्रमाणात आहे.

‘रॉकिंग हॉर्स’ या मांडणशिल्पामध्ये तीन वेगवेगळ्या आकारांचे लाकडी रंगीत घोडे मांडून त्यावर प्रेक्षकांना ‘तगडक, तगडक’ करण्याचा आनंद दिला आहे. खरं तर काही अशा मांडणशिल्पांमध्ये प्रेक्षकांना, रसिकांना सहभागी करून घेतले जात असले तरी महोत्सवाला भेट देणारे हुल्लडबाज प्रेक्षक सगळ्याच मांडणशिल्पांमध्ये घुसून, त्यावर बसून त्याची एक प्रकारे तोडफोडच करतात. त्यामुळे टाइम पॉज, डान्स ऑफ पास्ट अ‍ॅन्ड फ्युचरसारख्या काही मांडणशिल्पांचे दोरे तुटलेले होते. नौदल आणि भूदलाच्या एकत्रीकरणातून मांडलेला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला रणगाडाही या हुल्लडबाजीतून बचावला नाही, त्यामुळेच तिथे सुरक्षारक्षक तैनात करावा लागत होता. एवढेच नव्हे तर या प्रेक्षकांच्या तडाख्यातून मांडणशिल्पांची माहिती देणारे फलकही बचावले नाहीत. अनेक मांडणशिल्पांचे फलकच गायब झालेले आहेत.

चिमुकल्यांच्या स्वप्नांची दुनिया

इकडे अशी परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या आवारात मात्र सुखावणारे चित्र आहे. मुंबईतल्या विविध शाळांमधील मुलांनी एकच विषय न घेता मांडणशिल्पे तयार केली आहेत. विषयांच्या वैविध्याप्रमाणेच माध्यम, कल्पना, त्यामागचा विचार यांच्यातही वैविध्य आहे. ‘कल्पवृक्ष की छाया में’, ‘पगला घोडा’, ‘शेल्वड अ‍ॅस्पिरेशन’, ‘पिगॅसस’, ‘ड्रिम स्काय हाय’, ‘हॅव अ‍ॅन्ड हॅव नॉटस्’, ‘द विग्ज ऑफ चेंज’ अशी किती तरी मांडणशिल्पे लहान लहान कलाकारांची सर्जनशीलता आणि त्यांच्या कल्पनांना त्यांनी अतिशय विचारपूर्वक दिलेले मूर्तरूप पाहण्याची संधी देतात. ही संधी रविवार, १२ फेब्रुवारीपर्यंतच प्रेक्षकांना उपलब्ध आहे.