काला घोडा आर्ट फेस्टिव्हल (KGAF) हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळखली जातो. यंदा हा फेस्टिव्हल २१व्या वर्षांत पदार्पण करत आहे. १ ते १० फेब्रुवारी २०२० या कालावधीत काळा घोडा फेस्टिवल डिझाइन, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य आणि अनेक विविध प्रकारांतून रसिकांच्या भेटीस येत आहे.

काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलच्या २१व्या वर्धापनदिनानिमित्त काय काय गोष्टी येथे पाहायला मिळतील, ते जाणून घेऊयात..

संगीत – केजीएएफ २०२०चा संगीत सोहळा एखाद्या भव्य कॉन्सर्ट सारखाच रंगणार आहे. शिल्पा राव, जोनिता गांधी यांसारख्या संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या कलाकारांसह अनेक सुखद आश्चर्य दर दिवशी श्रोत्यांच्या भेटीला येणार आहेत.

साहित्य – सत्याचा वेध घेण्यावर २०२०चा भर आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य विभागामध्ये जेरी पिंटो, नीना गोपाल व असे कितीतरी लेखक असमानतेची वागणूक, ईशान्येतील कविता, स्थापत्य कलेतील अवकाश व त्याचा प्रभाव अशा विषयांवर रोचक चर्चा करतील. यावेळी उषा उत्तप यांचे आत्मचरित्र, शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या हस्ते कैफी आझमी यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कवितांच्या खास आवृत्तीचे प्रकाशन व असे कितीतरी पुस्तक प्रकाशन सोहळे पार पडणार आहेत.

लोकनृत्य – तान्या सक्सेना यांचे विविध भावना आणि रस प्रदर्शित करणारे भरतनाट्यम सादरीकरण

स्टँड अप कॉमेडी – अबीश मॅथ्यू, कनीझ सुरका, गुरसिमरन खंबा अशी स्टॅन्ड अप कॉमेडीच्या जगातील बडी बडी मंडळी महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी प्रेक्षकांना हास्य यात्रा घडवणार आहेत.

वर्कशॉप – उत्कर्ष पटेल आणि अरुंधती दासगुप्ता शोध घेणार मुंबईला घडविणाऱ्या मिथक आणि कहाण्या यांचा.

दृश्य कला – भावना सोनावणे – मोडी लिपीतल्या कविता – या कलाकृतीमधून पुरातन भाषा आणि झाडे यांसारख्या मूल्यांचा -हास दर्शवला गेला आहे. रुपाली मदन – भोवरा आणि त्याचा दोरा यांच्या दृश्य प्रतिमेतून मनुष्य आणि परमेश्वर यांच्यातील नैसर्गिक नाते दाखविण्यात आले आहे आणि आजच्या भौतिकतावादी जगामध्ये निरागसतेला पुन्हा एकदा स्थान मिळवून देणे अशा इतर कल्पनाही मांडल्या गेल्या आहेत.

काळा घोडा असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मानेक दावर म्हणाले, ”काळा घोडा कला महोत्सव हा नेहमीच समाजाला केंद्रस्थानी मानणारा सोहळा राहिला आहे. आणि लोकांनी लोकांसाठी भरवलेला कला मेळावा अशीच त्याची ओळख राहिली आहे. २०२० वर्ष हे समाजाच्या विविध स्तरांतील लोकांकडून आम्हाला सतत मिळत असलेल्या प्रेम आणि पाठिंब्याचे मूर्त रूप आहे. आज अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे आणि त्या प्रायोजक म्हणून आमच्याशी जोडल्या गेल्याने आमचा संघर्षाचा खडतर काळ संपला आहे. खरेतर या महिन्यास सुरुवातीला आम्ही निधी गोळा करण्यासाठी दिलेल्या हाकेला ओ देत कितीतरी व्यक्तीसुद्धा मदतीसाठी सरसावल्या आहेत. या प्रेमाबद्दल आम्ही सर्वांचेच ऋणी आहोत. काळा घोडा महोत्सवाच्या भव्यतेचे साक्षीदार बनण्यासाठी आम्ही जगभरातील लोकांना आमंत्रित करत आहोत.”